माझा विचार आहे : वेदनांची गझल : महेश वैद्य

                           
     
                             

ब-याच दिवसात एक अतिशय अप्रतिम असा गझलसंग्रह बघायला मिळाला. होय. अतिशय बोलकं शीर्षक आणि आकर्षक मुखपृष्ठ, मलपृष्ठ असा सुरेख संग्रह आहे. गझलसंग्रहाची पाठराखण गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे यांनी केली आहे. 
इथे वेदना नद्या जाहल्या तिच्या व्यथांच्या
तरी न भरला स्त्री दुःखाचा सागर येथे

                   सशक्त अभिव्यक्तीच्या अशा गझला घेऊन गझलकार सुनंदा पाटील मराठी गझल कारव्यात सामील होते आहे , असे पंडितजींचे आशीर्वाद घेउन गझलनंदाचा हा अप्रतिम काव्यसंग्रह अधिक बोलका होतो .

नावापासूनच एक वेगळेपण या गझलसंग्रहाने जपले आहे . जेष्ठ गझलकार ए .के. शेख यांची प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे . "गझलसम्राट सुरेश भट यांचं सखोल मार्गदर्शन लाभलेल्या महाराष्ट्रातील अनेक भाग्यवान गझलकारांपैकी त्या एक अत्यंत आश्वासक स्त्री गझलकारा " असं शेख सर म्हणतात .
कल्याणचे सुप्रसिध्द जेष्ठ गझलकार प्रशांत वैद्य यांनी या संग्रहाला शुभेच्छा दिल्या आहेत . "तंत्रशुद्ध गझल हे त्यांचं बलस्थान आहे . आज अतिशय दमदार वाटचाल करणाऱ्या अनेक स्त्री गझलकारांमध्ये सुनंदा पाटील हे सातत्याने स्वतःचं वेगळेपण टिकवणारं नाव " असं वैद्य म्हणतात .
स्वतःच्या आयुष्याची खडतर वाट तुडवीत स्वतःचा राजमार्ग स्वतःच निर्माण करणारी गझलनंदा तिचं मनोगत व्यक्त करते ,ते अतिशय भावनाप्रधान आहे , जे सांगून कळत नाही . वाचावंच लागतं . गझलनंदा म्हणतात '

मला भेट द्यावी सुखाने जराशी
तशी वारशानेच दुःखे मिळाली

             ही वेदनेची गझल आहे .प्रभावी व्यक्तीमत्वाखेरीज प्रभावी गझल लिहिता येत नाही . ताईंनी संग्रह स्व . सुरेश भट यांना अर्पण केला आहे , तो या शेरासह

नव्या पिढीला खयाल सुचतो नाविन्याचा
अर्थासाठी वृद्ध तराणा सादर करते
अतिशय नेमकी अशी शब्दकळा या ठिकाणी जाणवते. लक्ष वेधून घेते ती पहिलीच गझल. 'माझा विचार आहे '

भावास सोबतीला घेऊन चालले मी
पुसले मला जगाने हा कोण यार आहे

एकाकी स्त्रीची विटंबना याहून दुसऱ्या शब्दात व्यक्त होऊच शकत नाही .

निर्भया अभयास होते शाप काही भोवले
भोगता कलिका अशा विद्रूप झाली माणसे

या पिढीचा वारसाही सांगते माझी गझल
दाद देताना अशी का चूप झाली माणसे

अर्थाच्या सोबतच अनवट काफिया हे वेगळेपण दाखवणारी ही गझल आहे ‌. जागोजाग दिसणारी स्त्री वेदना हे संग्रहाचे वैशिष्ट्य आहे. एकाकी, विधवा , स्त्रीभ्रूण अशी विविध आशय चित्रे आपल्याला आढळतात .

कोणी लुटून नेले भाळासवे सुरवाला
मज शील मागणारा मग साव पाहिला मी

 शेळीस बांधलेले खुंटीस एकटीला
वस्तीत लांडग्यांचा झाला सुकाळ आहे

अतिशय मोजक्या शब्दात समाजाचं हे क्रूर चित्र रेखाटावं ते गझलनंदानेच.

आई म्हणते बरेच झाले मुलगी झाली
तिच्या पित्याला किमान आता बाई कळली

कुंकवाच्या संपण्याने फारसे बिघडत नसावे
रिक्त जागेच्या ठिकाणी घे सुपारी कनवटीला

                                           पुरुषप्रधान समाजाची याहून दुसरी उत्तम, नेमकी जाहिरात असूच शकत नाही . हे वानगीदाखल काही शेर आहेत . विरह ,पाझर, काटा , जुळा वनवास अशा कितीतरी केवळ वाचनीयच नव्हेत तर मननीय अशा गझला आहेत . प्रेम हा गझलेचा स्थायीभाव आहे . सुनंदाताईंच्या गझला इथेही कमी पडत नाहीत .हळुवार अशा अनेक गझला इथे आहेत. तुझ्या कळ्या तुझी फुले , मी पहाटे जागताना ,तरंग, तीळ बोलला , ओठ, स्पर्श  अशा प्रेमभावनेने युक्त मुसलसल अनेक गझल इथे भेटतात .

याच ओंजळीत घेतली फुले नवी
मोगऱ्यासवे जुईसही रहायचे 

ओठावरचा तीळ बोलला मीच पहारा करतो
रात्रीचा अंधार सांगतो मला इशारा कळतो

घेता मिठीत माझा मी चंद्र पौर्णिमेचा
आवेगल्या क्षणांचा केला स्विकार रात्री

कुणी न पाहिले असे कुठे न आरसा
म्हणून घे हळूच तू पुसून ओठ हे

या आणि अशा अनेक समृद्ध शेरांनी हा गझलसंग्रह नटलेला आहे . सामाजिक भान जागे असणारा हा संग्रह आहे . नजाकतदार, काहीशा हळव्या, वेदना सांगणाऱ्या गझला इथे भेटतात. प्रतिभेचा उत्कृष्ट आविष्कार असेच या गझलसंग्रहाचे वर्णन करावे लागेल. गझलनंदाची प्रगल्भ आणि वैचारिक जीवनदृष्टी, अभिव्यक्तीची सहजता विलक्षण आहे .आदर्शात्मक, सांकेतिक , कल्पनारम्य तरीही वास्तव जीवनाच्या विविध छटा वाचकाला अंतर्मुख करतात . अस्वस्थ करतात  ही गझल काहीशी गूढ पण अर्थपूर्ण आणि मनोवृत्तीचे मूल्यमापन नेमकेपणाने करणारी आहे .
                   संग्रहात आलंकारिक , सांगितिक उल्लेख अनेक ठिकाणी लक्ष वेधून घेतात , तेव्हा गझलनंदाच्या बहूआयामी व्यक्तिमत्वाची ओळख होते . अचूक व्याकरण, शुध्दलेखन, चपखल गझलतंत्र या संग्रहाच्या जमेच्या बाजू आहेत. इथे आनंदकंद ,भुजंगप्रयात , मंजुघोषा, व्योमगंगा, देवप्रिया, वियदगंगा, या नेहमीच्या वृत्तांशिवाय कालिंदनंदिनी , सौदामिनी, कलापती ,जलौघवेगा , भामिनी, चंचला, प्रभाव , ही वृत्ते ताईंनी सहज हाताळली आहेत .याशिवाय वनहरिणी, अनलज्वाला, लवंगलता , पादाकुलक ही मात्रावृत्ते संग्रहाची जमेची बाजू आहे. अचूक गझलतंत्रामुळे नवीन शिकणाऱ्या गझलकारांसाठी एक संदर्भ म्हणून हा संग्रह उपयुक्त ठरेल.
पाच शेरांनी मला समृध्द केले. फक्त जखमांचा जरा विस्तार झाला, असं सांगणारा , पारायणे करावी असा हा गझलसंग्रह, रसिकांच्या संग्रही असायलाच हवा . पुढील गझलसंग्रहाच्या अपेक्षेत.
.............................................
महेश वैद्य 
नागपूर
गझलकारा- सुनंदा पाटील
प्रकाशक - पृथ्वीराज प्रकाशन पुणे ९९२२१७२९७६
स्वागतमुल्य १५०/-
८४२२०८९६६६

No comments:

Post a Comment