भागवत विजय देवकर : दोन गझला



१.
खुणा पाहून चाकांच्या दुतर्फा गाडवाटीला
पुन्हा वाटे निघावे भेटण्या शेतात मातीला

कितीदा हिंडलो आपण उन्हातान्हात अनवाणी
कधी झापा बसाव्या अन कधी काटेच साथीला

पकडले चोर आम्ही भोवरा मातीत दिसला की
किती झाले तरी याची न सर येणार पबजीला

असावे भान वेळेचे सकाळी कोंबडा सांगे
कशा येतात बघ गोठ्यात गायी सांजवेळीला

तिला भेटायचो त्या आठवांचा पूर बघ येतो
कधी भेटेल पारावर पुन्हा ती चांदरातीला

२.
व्याकूळ आज माझी ही येरझार आहे
भेटायची जिथे तू  ओसाड पार आहे

जिंकू तुला कसा मी होणार ना लढाई
तू तर जमीन सेना मी आरमार आहे

बंधात बांधलेली येथे हरेक वस्तू
हे तर रसायनाचे बेसिकच यार आहे

येऊ नये उदासी एका पराभवाने
मेहनत वाढवावी तू जिंकणार आहे

तोडू नकोस लेका तू झाड वाढलेले
झाडाविना न पाणी साधा विचार आहे

.............................................   

भागवत विजय देवकर
पान्हेरा
ता. मलकापूर
जिल्हा. बुलढाणा
७०२०४८७२४२

2 comments: