डॉ. सुनील अहिरराव : पाच गझला


१.
शेवटी हे एक कोडे राहिले
हरवला माणूस, जोडे राहिले

लुप्त झाला एकटा योद्धा रणी
ते पहा मागे भगोडे राहिले

पोचला जो तो घरी आपापल्या
आपल्या रस्त्यात रोडे राहिले

हारले अन झोपले सारे शहर
नेमके जागे सटोडे राहिले

तू अता ये वा नको येऊ प्रिये
(दु:ख आता फार थोडे राहिले)

तोडले मंदिर कुणी, मस्जिद कुणी
आपल्या हाती हतोडे राहिले

२.
मांडला होतास तू होरा तरी
संपला नाहीच चाकोरा, तरी !

काजळी धरली नशीबाने तुझ्या
चेहरा आहे तुझा गोरा तरी

वाकली आहेस तू कमरेमधे  
केवढा दुनिये तुझा तोरा, तरी

चेहरा आदिम अजूनी दावतो
आरसा आहे नवा कोरा तरी ..

जायचे आहेच जर केव्हातरी
आवरावा बिस्तराबोरा तरी

देव राऊळात निपचित झोपतो
ऐकतो दररोज टाहोरा तरी

३.
दैवही आले फळाला,तर बघू 
(लागला मासा गळाला,तर बघू)

मारती आता उड्या गगनात जे 
लोक ते गेले तळाला, तर बघू

आजवर दुश्मन जमा झाले किती
दोस्तही कोणी मिळाला तर बघू

सूर्य का विझतो अघोरी सावलीने
(दृष्ट झाली काजळाला तर बघू)

देव हा नाकासमोरच चालतो
तो कुठे केव्हा वळाला तर बघू

साचला कचरा किती दुनियेत हा
जाग आली वादळाला तर बघू

तांबडे फुटलेच आहे आजही
(सूर्य हा कोठे पळाला, तर बघू)

४.
केवढे आले जहर आतुन
(वाटते, मेले शहर आतुन)

मामला साधासुधा होता
पेरले कोणी कहर आतुन

वाहुनी सवतासुभा गेला
ही जशी आली लहर आतुन

कागदी होती फुले सारी
कोणते आले बहर आतुन

हा जिव्हाळाही खरा नाही
आटले सारे नहर आतुन

कोरड्या माझ्यातुझ्या भेटी
(चिंब भिजलेले प्रहर आतुन ..)

५.
देव देव्हारे धरुन बसले
भक्त गल्ला आवरून बसले

हे नको, तेही नको म्हणता
जे नको तेही करून बसले

पारधी निष्णात होते पण
सावजाला घाबरून बसले

थोर जव्हेरी युगापासुन
कोळसे काळे भरून बसले

नागडे आहेच जग सारे
पण जरासे सावरून बसले

आश्रयाला पातले मूषक
नी घराला पोखरुन बसले

बावळ्यांचे राज्य आल्यावर
शाहणे डोके फिरून, बसले

 ................................  

डॉ. सुनील अहिरराव

No comments:

Post a Comment