डॉ. सुनंदा शेळके : तीन गझला१.
मी गझलेच्या धुंदीमध्ये मस्त सखे
तिच्या सोबती जगणे माझे स्वस्थ सखे.

श्रावण जातो मनात शिंपून गंधसडा
फेर धरूनी मनी नाचतो हस्त सखे.

लपवुन अश्रू दुःखाला तू हसव जरा
करून टाकू आनंदाला स्वस्त सखे.

कंटाळा मज येतच नाही कधी कशाचा
मला ठेवते नेहमीच मी व्यस्त सखे.

चिंता-भीती सोडून हो तू मुक्त जरा
कशास इतकी होऊन जाशी त्रस्त सखे?

निसर्ग सारा मला वाटतो जीवलग माझा
चंद्र घालतो माझ्यावरती गस्त सखे.

पुनर्भेटीचा करून वायदा जाता-जाता
रंग उधळतो सूर्याचाही अस्त सखे.

२.
झेलुनी मस्तीत घ्यावा पावसाळा
अन् स्मृतींना भेट द्यावा पावसाळा.

अंग अंगी तापल्या आहेत तारा
आज वाटे खूप ल्यावा पावसाळा.

जन्म व्हावा श्रावणाची धून वेडी
गंधुनी प्राणात यावा पावसाळा.

पाचूच्या स्रुष्टीस यावे रंग साती
एवढ्या तृप्तीत प्यावा पावसाळा.

कोरडे माथे जिथे राना-वनांचे
वाटते तेथेही न्यावा पावसाळा.

ज्या भुईचा कंठ आहे शोषलेला
शांतवाया तेथ जावा पावसाळा.

मेघ आले दाटुनी चारी दिशांनी
नाचताना मोर गावा पावसाळा.

३.
करतात आतुनी आत्मा सुंदर गझला
देतात सावली मला निरंतर गझला.

हे जगणे माझे आत्मिक, सालस, हळवे
देतील तयाचे या प्रत्यंतर गझला.

मन रिझवायाला लागत नाही काही
करतात सुखाचे जंतर-मंतर गझला.

मी मांडत नाही सार उभ्या जन्माचे
माझ्यासम जगती मस्त कलंदर गझला.

ऐकताच मजला विचारती बघ सारे
'सुचतात कशा या सुंदर सुंदर गझला? '

तू जपून ठेव हे शब्द तुझ्या ह्रदयाशी
उलगडती माझे अंतर - अंतर गझला.

मी नसेन जेंव्हा पडद्यावर काळाच्या
गातील कुणीतर माझ्या नंतर गझला
.............................................
डॉ. सुनंदा शेळके, जयसिंगपूर 9881657221

1 comment:

  1. All online casino games | CasinoWild Casino
    Online casino games have become popular and you should definitely keep an eye on their 샌즈카지노 games to learn how and where to play them and 메리트카지노총판 what is Mar 15, 2019 · Uploaded by CasinoWild 인카지노 - Best Online Casino for Real Money

    ReplyDelete