निर्मला सोनी : पाच गझला

Image may contain: 1 person, close-up


१.
रडू देत नाही, हसू देत नाही,
मनासारखे जग, जगू देत नाही!

सदा घाव देती, बिचा-या मनावर,
कधी वेदना ही, सरू देत नाही!

कुणाचीच नाही, कुणालाच पर्वा,
तरी वाटते ते, करू देत नाही!

जगावे मनाने, सदा का जगाच्या,
जगावेगळे ही, घडू देत नाही!

कशी ऐकवावी, कहाणी सुखाची,
खुशाली कुणाची, कळू देत नाही!

२.
सदा रे घेतला आहे जगाने आळ प्रारब्धा
कसे सांगू कुणा सांगू  मला सांभाळ प्रारब्धा

कधीचा नाचतो आहे इशा-यावर जगाच्या या
जणू की बांधले आहे क्षणाने चाळ प्रारब्धा

कुणी ना पाहिले आहे कुणी ना जाणले आहे
कुणाशी जोडली आहे कुणाची नाळ प्रारब्धा

हवासा वाटला नाही कधी कोणास हा मृत्यू
जरी होते मनाची या सदा आबाळ प्रारब्धा

जसे आले तसे गेले कुणाला भेटले नाही
असावे दैव माझे ते जरा नाठाळ प्रारब्धा

भुकेने ग्रासले आहे बळीच्या आज बाळाला
दिसेना का तरी त्याच्या चुलीला जाळ प्रारब्धा

नकोसे भेटणे वाटे नकोसे पाहणे वाटे
मनाच्या अंगणी आला कसा दुष्काळ प्रारब्धा

जरा तू हात दे हाती दिलासा दे मनाला या
जगाची बंधने सारी कधी तर टाळ प्रारब्धा


कधी मी सावली झाले कधी मी बाहुली झाले
कसा आणू पुन्हा मी तो सुखाचा काळ प्रारब्धा

३.
तुला का वाटते आहे, मनाचा भास आहे मी,
नको टाळू मला वेडया, तुझा मधुमास आहे मी

भरवसा ठेव माझ्यावर, खरे मी सांगते आहे
जगाच्या सारखी नाही , मनाने खास आहे मी

तुझ्या हृदयात आहे मी, तुझ्या स्वप्नात आहे मी
नको समजू मला खोटे, खरा आभास आहे मी

तुझा तो हात प्रेमाने, जरा हातात दे माझ्या
कधी तुटणार नाही रे, असा विश्वास आहे मी

नको अर्ध्यावरी सोडू, मला वाटेत प्रेमाच्या
पहा निरखून तू मजला, सुखाची आस आहे मी

४.
वादळा तुज भेटण्याला, मी कुठे नाही म्हणाले
सोबतीने चालण्याला, मी कुठे नाही म्हणाले

सौख्य मी घेऊन येतो, तो मला सांगून गेला
वाट त्याची पाहण्याला, मी कुठे नाही म्हणाले

रंग आयुष्या तुझा रे, भासतो आहे निराळा
सप्तरंगी रंगण्याला, मी कुठे नाही म्हणाले

खेळ सारीपाट दुनिये, तू क्षणाच्या जीवनाचा
खेळ तो ही जिंकण्याला, मी कुठे नाही म्हणाले

साथ ते सौख्यात देती, रीत आहे या जगाची
दुःख सारे सोसण्याला, मी कुठे नाही म्हणाले

पाहिली काया जगाने, भाग्य त्याचे पाहिले ना
दैव त्याचे रेखण्याला, मी कुठे नाही म्हणाले

जिंदगी विरहात आहे, जाणते आहे सखे तू
वेदने तुज साहण्याला, मी कुठे नाही म्हणाले

ज्ञान जे देऊन गेले, लोक होते वेगळे ते
मोल त्यांचे जाणण्याला, मी कुठे नाही म्हणाले

गीत प्रेमाचे सदा रे, गुणगुणावे या जगाने
सूर त्यांना लावण्याला, मी कुठे नाही म्हणाले

५.
आणखी मजला किती छळशील मृत्यो,
शेवटी तू एकटा पडशील मृत्यो..

भेट झाली जर तुझी माझी कधी तर
सांगते, माझ्यापुढे हरशील मृत्यो..

भेट आयुष्यास दे केव्हा तरी या
सप्तरंगी त्यास तू बघशील मृत्यो..

खोड भारी जी तुझी माहीत आहे,
एकटा येऊन मज धरशील मृत्यो..

मी तुझ्या हृदयास जिंकेन जेव्हा
रंग तेव्हा जीवनी भरशील मृत्यो..

बोलले प्रारब्ध माझे जे तुझ्याशी,
ती कथा ऐकून बघ रडशील मृत्यो..

चांगला नाहीस तू म्हणतात सारे,
या जगाला तू कधी कळशील मृत्यो..

................................................
निर्मला सोनी

No comments:

Post a Comment