मराठी आणि गुजराती गझलेच्या विकासावर एक तुलनात्मक नोंद : हेमंत पुणेकर

                        

 गुजराती गझलेची सुरुवात १८८० च्या दशकात झाल्याचे मानले [१] तर मराठी गझल फारफार तर ४० वर्ष लहान आहे [२] असे म्हणता येईल पण मराठीत गझल काव्यप्रकाराचा विकास गुजराती एवढा झाला नाही. याची मुख्य दोन कारणे या प्रमाणे आहेत - मराठी साहित्यकारांची अमराठी साहित्यप्रकारांसाठीची उदासीनता आणि मराठी गझलात वापरले जाणारे वृत्त. यांना जरा विस्तारपूर्वक तपासून पाहू.
१) शिवाजी महाराजांनी ईसवीसनाच्या १७व्या शतकात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि १८व्या शतकाच्या मध्या पर्यंत मराठे अटकेपासून कटके पर्यंत राज्य करत होते. हे "अटक ते कटक" हे वाक्य मराठी माणसाच्या तोंडून आज ही ऐकायला मिळतं. दीर्घकाळ राजकीय सत्ता भोगणाऱ्या या समाजाची अस्मिता - मराठी बाणा - अर्थातच खूप दृढ आहे आणि मराठी साहित्यकारांवर पण त्याचा प्रभाव आहे. काही अपवाद वगळले तर बहुसंख्य मराठी कवि मराठी बाह्य साहित्यप्रकारांसाठी काही प्रमाणात उदासीन राहिले किंवा त्यांच्या मराठीकरणासाठी जरा जास्तच सजग राहिले. या मुळे मराठीत बाहेरून आलेले काव्यप्रकार मोठ्याप्रमाणात रूढ झालेले दिसत नाही. गुजरातीत सॉनेट, हाईकु आणि गझल हे काव्यप्रकार मोठ्याप्रमाणात हाताळले गेले पण मराठीत तसे झाले नाही. कुसुमाग्रजांनी सुनीत नावाने युरोपियन काव्यप्रकार सॉनेट मराठीत आणण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला असेच म्हणावे लागेल. असेच काही प्रमाणात गझलेचे झाले. गझल आज मोठ्याप्रमाणात लिहिली जात असली तरी ते प्रमाण गुजराती आणि हिंदी एवढे नाही. उर्दू, हिंदी किंवा गुजराती गझल परंपरेला जाणणाऱ्या मराठी गझलकारांची संख्या बोटावर मोजता येण्या एवढीच आहे. मला आजवर फक्त एक मराठी गझलकार अशे भेटले ज्यांना गुजरातीत गालिब सारखे मान मिळवणारे गझलकार मरीझ माहित होते. ज्या मराठी गझलकारांनी अन्य परंपरांचा, खास तर उर्दू परंपरेचा, अभ्यास केला आहे त्यांचे लक्ष पण काव्यतत्त्वा कडे, गझलेच्या आंतरविश्वाकडे केंद्रित राहिले आहे. गझलच्या तंत्राचे बारकावे जाणणारे फारशे गझलकार मराठीकडे नाही हे निराशाजनक वास्तव आहे. ही च बाब आपल्याला दुसऱ्या कारणाकडे घेऊन जाते.
२) मराठी गझलेचा विकास कुंठित होण्या मागचे दुसरे महत्वाचे कारण मराठी गझलेत वापरण्यात येणाऱ्या वृत्तांमधे लपलेले आहे.  माधव जूलियन यांनी गझल मराठीत आणली. ते छंदशास्त्री पण होते. अरबी, फारसी आणि उर्दू गझलेत शब्दांच्या उच्चारी वजनां प्रमाणे वृत्तांमधे बरीच सूट घेण्यात येते. माधवरावांना ते सर्व अशुद्ध वाटलं आणि त्यांनी ई.स. १९३७ साली प्रकाशित केलेल्या "छंदोरचना" नामक पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिले की हे फारसी वृत्त "शुद्ध" स्वरूपात मराठीत वापरावे.[३] त्यांनी सूट घेतल्या शिवाय लघु-गुरूचे संस्कृत पिंगळाच्या पारंपारिक नियमांचे पालन करत गझला लिहिल्या. सूट घेतल्याने, खास तर उर्दूत ज्याला "हर्फ गिराना" म्हणतात अशी गुरूचे लघु करण्याची सूट घेतल्याने, गझल रचना सोपी होते. सूट न घेतल्याने गझलेचा प्राण असलेल्या बोलाचालीची भाषेला वृत्तबद्ध करणे अवघड होते. आज ही मराठी गझल या समस्येने ग्रस्त आहे. याच्या बिलकुल उलट गुजरातीचे आद्यगझलकार शयदा (ई.स. १८९२ - १९६२) आणि त्यांच्या पूर्वसूरींनी ही सूट घेण्याची पद्धत खूप छान पद्धतीने गुजरातीत नेली ज्याचा भरपूर फायदा गुजराती गझलेला झाला. [४]
सुरेश भट प्रतिभावान गझलकार होते पण छंदशास्त्री नव्हते. त्यांनी गझलेच्या बाराखडीत विधान केले "शक्यतोवर गणवृत्तात लिहावे. अगदी आवश्यक असल्यासच मात्रावृत्तांचा (जातीचा) उपयोग करावा." [५] त्यांनी स्वतः काही गझला मात्रावृत्तांमधे लिहिल्या पण त्यांच्या बहुतांश गझला गणवृत्तातच आहेत. भट साहेबांनी दोन लघु जवळजवळ येतात अश्या षट्कल वृत्तांमधे काही गझला लिहिल्या पण त्यांचा मोठ्याप्रमाणात वापर ते करू शकले नाही. (उदा. कळे न काय कळे एवढे कळून मला/ लगाल गाललगा गालगाल गागागा/गाललगा, कभी कभी मेरे दिल में ... ही नझम या वृत्तातच आहे) [६] भट साहेबांचे फरमान त्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या गझलकारांनी तर पाळले पण ९०च्या दशकात आणि त्या नंतर आलेल्या गझलकारांना गणवृत्त खूप बंधनकारक वाटल्याने त्यातले बरेच गझलकार त्या फरमानातली "शक्य तोवर" ही पळवाट घेत सर्रास पारंपारिक मात्रावृत्तांच्या दिशेत वळून गेले. उर्दूत बहेरे मीर नावाने ओळखले जाणारे आठ मात्रांचे वृत्त जरी आपल्या पारंपारिक मात्रावृत्तांसारखे असले तरी त्यात कोणच्या गुरूचे दोन लघु करायचे या वर काही बंधनं आहेत. ती बंधने जाऊच द्या आजच्या काही मराठी गझलकारांना तर मात्रावृत्तांची नैसर्गिक लयच माहित नसावी आणि ते फक्त मात्रांचे शुष्क गणित करतात कि काय असे चित्र दिसते.
                       लघु गुरूंचे संस्कृत पिंगळातून आलेले बंधनकारक नियम स्वीकारल्याने मराठी गझल सीमित गणवृत्तांपासून शुष्क मात्रावृत्तांमधे अडकलेली दिसते. अरबी-फारसी पासून उर्दू, हिंदी आणि गुजराती पर्यंतचा गझलेचा प्रवास हे दाखवतो की गझलेच्या रसप्रवाही वृतांचा आणि त्यात होणाऱ्या भाषेच्या लवचिक वापराचा गझलेच्या सफलतेत मोठा वाटा आहे. ई.स. २०१० च्या दशकात मराठी भाषी गुजराती गझलकार विवेक काणे, मकरंद मुसळे आणि या लेखकाने मराठी गझलकारांचे लक्ष या सूटींकडे वेधण्याचा प्रयत्न केला. डॉ. श्रीकृष्ण राऊत यांनी गझलकार सीमोल्लंघनाच्या २०१८च्या अंकात "गझलेच्या वृत्तातली लवचिकता" या लेखात याची सविस्तर नोंद घेतली आहे. [७]
उपसंहार
आजच्या मराठी गझलेचा प्रवाह मुख्यतः दोन धारांमधे वाहतांना दिसतो. अनंत ढवळे सारखे गझलकार ज्यांनी सुरुवातीला सामाजिक विषयावर सुंदर गझला लिहिल्या ते हळूहळू ऍबस्ट्रॅक्ट गझलांकडे वळले आणि त्यांच्या प्रभावात बरेच गझलकार त्या दिशेत गेले. या कविंची ईंग्रजी-मराठी मुक्तछंद कवितेशी जवळीक, उर्दूतल्या ऍंटीगझल चळवळीशी परिचय वगैरे कारणांने हे झाले असण्याची शक्यता आहे. अश्या गझलांच्या बाह्य स्वरूपात जरा जास्तच सूट घेण्यात येते - अशुद्ध मात्रावृत्त, रदीफ शिवाय स्वरकाफियांचा वापर वगैरे ही पहायला मिळतात. ही एक धारा आहे तर दुसरी कडे पारंपारिक बाह्यस्वरूप आणि वाणी जपत गझल लिहिणाऱ्या गझलकारांची दुसरी धारा ही आहे. पहिल्या धारेतल्या गझलकारांचे शेर बरेचदा संदिग्ध राहून जातात तर दुसऱ्या धारेतल्या गझलकारांचे शेर जास्तच मुखर होतांना दिसतात. तुकाराम आणि अन्य संतकवींच्या कवितेचे संस्कार मिळालेले कवी बरेचदा स्थूल व्यंग/वक्रोक्तीचा वापर करतांना दिसतात जे गझलेच्या "तासीर"शी फार जुळणारे नाही. हिंदी-गुजरातीत ही बरेच संत साहित्य असले तरी गझलेवर त्यांच्या कथनशैलीचा प्रभाव फारसा नाही हे नोंदायला हवे. बरेचदा एकाच गझलेत या दोनी धारांचे शेर बघायला मिळतात. या सर्वांमधे कुठेतरी खरीखुरी गझल ही लिहिली जात आहे जी मराठी गझलेच्या भविष्यासाठी आशास्पद बाब आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणून चित्तरंजन भट यांच्या एका सुंदर शेराने या लेखाची सांगता करूया.

हे तुझे ओठ हे तुझे डोळे
संपणारा विषय कुठे आहे?

(विषय या शब्दाला ज्या दोन अर्थछटा आहेत त्यांचा विचार करून बघा म्हणजे या शेराची मजा कळेल)
- हेमंत पुणेकर 

[१] "गुजराती गझल ‐ १५० वषार्ंची एक समृद्ध परंपरा", हेमंत पुणेकर, समकालीन गझल अंक १, सप्टेंबर २०१६
[२]  "मराठी गझल", श्रीकृष्ण राऊत,  १७ ऑक्टोबर, २०१०, http://gazalakar.blogspot.com/2010/10/blog-post_8664.html?m=1
[३] "गझलांच्या वृत्तातली लवचिकता", श्रीकृष्ण राऊत, गझलकार सीमोल्लंघन २o१८, https://seemollanghan18.blogspot.com
[४] [१]
[५] "गझलेची बाराखडी", सुरेश भट, एल्गार, साहित्य प्रसार केंद्र, ८वी आवृत्ती, २०११
[६] "उर्दू व गुजराती गझलचे वृत्त - डॉ. रईश मनीआर", अनुवाद: हेमंत पुणेकर, गझलकार सीमोल्लंघन १४, http://gazalkar14.blogspot.com/
[७] [३]   

3 comments:

  1. लेखात खूप महत्त्वपूर्ण माहिती....मिळाली

    ReplyDelete