बाराखडीनंतर... : श्रीकृष्ण राऊत



तंत्रासोबतचा मंत्र
_______________

                    १९३३ साली माधव जूलियन यांचा  'गज्जलांजलि ' हा गझलसंग्रह प्रसिद्ध झाला. माधव जूलियन यांनी स्वतः ह्या संग्रहाला प्रस्तावना लिहिली आहे. ह्या प्रस्तावनेत गझलच्या आकृतीबंधाविषयी वृत्त,आशय,गायन अशा अंगाने त्यांनी  केलेले भाष्य अत्यंत मौलिक आहे. ह्या प्रस्तावनेत माधवराव लिहितात -
                'फार्सी गज्जलांचा  दोष म्हणजे विषय वैचित्र्याचा अभाव हा होय. सारे कवि तोच तोच अर्थ, फक्त अधिकाधिक सफाईदार व आलंकारिक भाषेने व्यक्त करण्याचा उद्योग करितात.'
उर्दू -हिन्दीतील गझला आपण वाचत गेलो तर हाच अनुभव येतो. मराठीतले गझलसंग्रह, दिवाळी अंकातल्या, फेसबुकवरच्या गझला आपण गंभीरपणे वाचायला घेतल्या तर माधवराव म्हणतात तसाच 'उद्योग ' मराठीतही सुरू असल्याचे आपल्या लक्षात येते.
                 अलीकडच्या काळातीत उर्दूचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दिवंगत शायर शहरयार यांनी एका मुलाखतीत सांगितलेला तोडगा उर्दूसह सर्व भाषातील गझलकारांनी आपल्या गझललेखनात तंत्रासोबत मंत्रासारखा अमलात आणावा असाच आहे. शहरयार म्हणतात, "मेरी यह कोशिश रही है की जो बात कही गयी उसे मै दुबारा ना कहूँ " अशी 'कोशिश '  प्रामाणिकपणे मराठीत झाली तर  काळाच्या कठोर समीक्षेच्या कसोटीवर मराठी गझल खरी उतरेल, यात शंका नाही. 
              पुण्याच्या सुरेश भट गझलमंचच्या 'गझलरंग ' मुशायऱ्यांतून सादर झालेल्या  गझलकारांचा,
'गझलरंग -१' हा प्रातिनिधिक गझलसंग्रह वाचताना ह्यातील गझलकार तशी 'कोशिश' करताना दिसतात ; ही अंत्यत समाधानाची बाब आहे. उर्दू -हिन्दी गझलातून आयात केलेल्या आशयाचा मराठी अनुवाद किंवा मराठीतून मराठीत केलेले आशयाचे भाषांतर जेवढे कसोशीने टाळले जाईल तेवढे चांगले.

उत्तम कवितेचं व्यस्त प्रमाण
_______________________

इ.स. २००३ मध्ये सुरेश भटांचे देहावसान झाले. त्यानंतरच्या काळात संगणक,इंटरनेट, पोर्टल, ब्लॉग्ज, फेसबुक, यूट्युब, व्हॉट्सऍप, गझल गायनाच्या मैफिली, गझल मुशायरे अशी नवी माध्यमे मराठी गझलला उपलब्ध झाली.आणि गेल्या दहा-पंधरा वर्षात संख्येने फार मोठ्या प्रमाणात मराठीत गझल लिहिल्या गेली. अत्यंत माफक दरात मोबाईल डेटा उपलब्ध झाला त्यामुळे चोवीस तास सहज हाताशी असलेले फेसबुक आणि व्हॉट्सऍप ही आजच्या तारखेत मराठी गझलची हक्काची माध्यमे झाली. नव्या माध्यमांची नवलाई आणि अतिउत्साही तरुणाई  असा दुथडी भरून मराठी गझलचा प्रवाह सध्या वाहतो आहे. रचायला आणि वाचायलाही आटोपशीर असलेला गझलचा आकृतिबंध या प्रवाहाला वेगवान व्हायला सहाय्यभूत ठरतो आहे.प्रत्येक कालखंडात चांगल्या कवितेचं सुमार कवितेशी असणारं प्रमाण जसं व्यस्त  असतं तसंच प्रमाण ह्या डिजिटल माध्यमातून प्रसिद्ध होत असलेल्या चांगल्या गझलांचंही आहे.
चमत्कृतीजन्य अमूर्तता
_________________

हिन्दी - गुजराती गझलांच्या  अनुकरणातून आशयाची अमूर्तता, चमत्कृती सुद्धा मराठी गझलेत प्रवेश करू लागली आहे. अॅब्सर्ड आणि अॅबस्ट्रॅक्ट चित्रकलेसारखा हा प्रकार आहे. रंग -रेषा -आकार ह्या माध्यमाच्या तुलनेत गझलमधील अमूर्तता, चमत्कृती भाषिक पातळीवर  वाचकांशी संवाद साधण्यास असमर्थ ठरते.
१९७० च्या दशकात हा प्रयोग गुजराती गझलेत झाला पण तो फार काळ टिकला नाही. नंतरच्या गुजराती गझलकारांनी संवादी परंपरेचा धागा पुन्हा जुळवून घेतल्याचे दिसते. मराठी गझलेतील चमत्कृतीजन्य अमूर्ततेचे भागधेय यापेक्षा वेगळे असणार नाही. कारण भाषेचा जन्मच मुळात संवादासाठी झालेला आहे.
मात्रावृत्त,स्वर काफिया आणि आशयाची अभिव्यक्तीच्या पातळीवर होणारी अमूर्त मांडणी अशा त्रिमितीने आजची मराठी गझल तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या घाटदार वळणावर उभी आहे.

अर्थपूर्ण संवाद
____________

एखादा शेर वाचल्यावर मानवी जीवनदर्शनाच्या कुठल्या तरी पैलुचा उत्कट प्रत्यय वाचकाला आला की त्याच्या तोंडून सहज दाद निघते, 
''वा ! क्या बात है ! "
गझलकाराने वाचकाशी साधलेला हा अर्थपूर्ण संवाद असतो. हे विशेष संदेशवहन (communication) पूर्ण होताना  शब्दकोषाच्या किंवा आस्वादक समीक्षेच्या कुबड्या घेण्याची गरज वाचकाला पडत नाही.

शब्दकळा
_________

लिहिणाऱ्याच्या शेरातली शब्दकळा वाचणाऱ्याच्या दैनंदिन जीवनातली असते.
आणि त्यामुळेच गझलकार ते वाचक हा संवाद अर्थवहनातल्या अडथळ्याविना थेट होत असतो. कधीतरी क्वचित एखाद दुसरा अपवाद वगळता वाचकाला शब्दकोषाची गरज पडत नाही. खरं तर तेवढीही गरज पडता कामा नये.

प्रतिमा
______

                शेराची शब्दकळा जशी वाचकाला सुपरिचित असावी लागते.तशाच शेरातल्या प्रतिमाही वाचकाच्या ओळखीच्या असल्या पाहिजेत,तरच गझलकार ते वाचक हा संवाद काव्यसौंदर्याने अधिक खुलतो. त्यासाठी वाचकाला आस्वादक समीक्षेची मदत घ्यावी लागत नाही.

अनेकार्थ सूचनक्षमतेच्या मर्यादा
_________________________

              अनेकार्थ सूचनक्षमता हे उत्तम कवितेचे लक्षण मान्य केले तरी प्रत्येक शेराच्या बाबत ते लागू पडतेच असे नाही. 'अनेकार्थ सूचनक्षमता ' ही  संज्ञा तिच्या मर्यादांसह अत्यंत तारतम्याने विचारात घेतली पाहिजे. स्थळ, काळ, परिस्थिती आणि वाचकाची मनस्थिती बदलली की मुख्य अर्थाशिवाय त्याच शेराचा वेगळा अर्थ ध्वनीत होऊ शकतो.

विद्वत्तापूर्ण चर्चा
_____________

जो शेर गझलकाराला स्वतः किंवा आस्वादक समीक्षेला समजून सांगण्याचे काम पडते अशा शेराच्या वाटेला वाचक जात नाही. शेराला पिळून अर्थ काढणाऱ्या  विद्वत्तापूर्ण चर्चेत त्याला रस नसतो.

शेरातला 'मी '
___________

             कवितेपेक्षा गझलेत 'मी ' अधिक आढळतो कारण गझलेचा स्वर संवादी असतो. संवादात 'मी- माझे, तू- तुझे, आम्ही -आमचे , तुम्ही -तुमचे, ते - त्यांचे ' अपरिहार्य असते. गझलेतला 'मी ' हा निवेदक असतो. तो एकाचवेळी आत्मनिष्ठ आणि समष्टीचा प्रवक्ता असतो. त्यामुळे गझलेत गझलकाराचे आत्मचरित्र शोधणाऱ्याला सत्य गवसत नसते. खरं तर असा शोध घेणं हा व्यक्तीचा आणि अभिव्यक्तीचा उपमर्द असतो, ह्याचं भान सभ्य वाचनसंस्कृतीला निश्चितच असतं.

काफियाशास्त्र
____________

गझल हा यमकप्रधान काव्यप्रकार आहे. परंतु इतर काव्यप्रकारातील यमक आणि   गझलेत येणाऱ्या यमकात फरक असतो. अक्षरांच्या पुनरावृत्तीपूर्वी येणाऱ्या स्वराचा विचार गझलमधील यमकात अपरिहार्य असतो. गझलरचनेतील अशा प्रकारच्या यमकाला काफिया म्हणतात.
                   उर्दूत अरुजच्या म्हणजे छंदशास्त्रा  सोबत काफिया शास्त्र विकसित झाले. त्यावर पुस्तकं लिहिली गेली. त्यात काफियाचे खूप सारे  नियम -उपनियम सांगितले गेले.परंतु गझलच्या उत्स्फूर्त आणि सहज रचनेला ते जाचक असल्याने अनेक उस्ताद शायरांनी ते मोडून उत्तम गझला लिहिल्या. कालांतराने नियम कमी आणि अपवाद जास्त अशी स्थिती निर्माण झाली. पुढे छंदशास्त्र आणि काफियाशास्त्र कामापुरते स्वीकारून आशयनिष्ठ गझलांची रचना होत राहिली.


काफियाचे शब्द : Key Words
__________________________



गझलेमध्ये काफियाचे शब्द हे Key Words असतात.कल्पनेला वेगळ्या त-हेने सुचविण्याची किल्ली काफियांच्या शब्दात असते. ही किल्ली विविध आयामात फिरविण्याची क्षमता  कवीच्या प्रतिभेत कितपत आहे यावर शेरांच्या सृजनाचा दर्जा अवलंबून असतो.
              काफियाचा शब्द,त्याच्या अर्थच्छटेच्या परिघामध्ये कल्पना सुचवतो आणि शेराचे सृजन होते. या दृष्टीने काफियाच्या शब्दांना  की वर्ड म्हणायचे. ही शेराची निर्मितीप्रक्रिया लिहिण्याचा प्रत्यक्ष अनुभव असणा-यांच्या चांगली परिचयाची असते. काफियाच्या सहा शब्दांकडून हे काम चोखपणे करून घेता आले तरी एक मतला आणि चार शेर अशी पाच शेरांची चांगली गझल होऊ शकेल. पण सुचतील तेवढे काफिये कामी लावून तेरा-चौदा शेरांची गझल जेव्हा केल्या जाते तेव्हा गझल ह्या यमकप्रधान काव्यप्रकारात काफियाच्या अंगाने तंत्रशरणता येईल. लिहिलेल्या एकूण शेरांपैकी स्वतःला उत्कृष्ट वाटणारे चारच शेर मतल्या सोबत गझलमध्ये ठेवले तरी ते वाचकांच्या स्मरणात राहतील. कोण्याही गझलकाराचे असे वीस-पंचवीस शेर जरी वाचकांना अनेक वर्षे आठवत राहिले तरी त्या गझलकाराच्या गझललेखनाचे सार्थक झाले असे समजावे.
              काफियाच्या की वर्डने नवकल्पनाविस्ताराने शेराचे सृजन केले की त्या काफियाच्या शब्दाचे स्वतंत्र अस्तित्व शेराच्या विधानात एकजीव होऊन गेलेले असते. असा सुटा शेर वाचतांना मूळ गझलेचा मतला माहीत नसल्यास  काफियाचा की वर्ड शोधणेही बरेचदा कठीण होऊन जाते. उदा. वर उल्लेख केलेल्या सुदर्शन फ़ाकिर यांच्या गझलेतील हा शेर-

लिखा था जिस किताब में कि इश्क़ तो हराम है
हुई वही किताब गुम बड़ी हसीन रात थी।

मतल्याचा शोध न घेता केवळ हा शेर वाचला तर सानी मिस-यातला कोणता शब्द काफियाचा आहे ?असा प्रश्न पडावा. रदीफाचे शब्द त्यामानाने दुय्यम असतात. काफियाने सुचवलेल्या कल्पनेच्या अंगाने सानी मिस-याचे विधान पूर्ण करून त्याला अर्थ प्रदान करण्याची जबाबदारी रदीफ निभवत असतो.

कला आणि कौशल्य यातल्या सीमारेषा
_______________________________

वेगळे काफिये आणि वेगळे रदीफ शोधणं केव्हाही चांगलं. गझलकाराचं वेगळेपण त्यातून सिद्ध होण्याच्या शक्यता अधिक असतात. पूर्वीच्या एखाद्या उत्कृष्ट कल्पनेने प्रेरित होऊन  त्याच कल्पनेचा स्फुरलेला वेगळा आयाम विरळा आणि त्याच कल्पनेची केलेली सही सही नक्कल निराळी .'खयाल' सेकंड हॅन्ड असला आणि 'अंदाजे बयाँ'कितीही फर्स्ट हॅन्ड ठेवला तरी त्याला गझलेतील नावीन्य (Originality) म्हणता येणार नाही. कला आणि कौशल्य यातल्या सीमारेषा गझल लिहिणा-याला पारखता आल्या पाहिजेत.

स्वर काफिया
___________

गझल हा यमकप्रधान काव्यप्रकार आहे. गझलमधील यमक म्हणजे काफिया. व्यंजनाचे काफिये निवडताना शब्द निवडीवर मर्यादा पडतात म्हणून स्वर काफियाचा उपयोग अधिक भाषिक लवचिकता प्रदान करणारा ठरला. 
आज उर्दू -हिंदीत साधारणतः चाळीस टक्के गझला स्वर काफियांच्या आढळतात. म्हणजे साठ टक्के गझला ह्या व्यंजन काफियांच्या आहेत. हे प्रमाण थेट ग़ालिबच्या काळापासून आजपावेतो कायम आहे. प्रत्येक भाषेतल्या म्हणींचा अभ्यास केला तर त्यात नैसर्गिक लयीने येणारी व्यजनांची सयमकता आपले लक्ष वेधून घेते. शेराला वारंवार उद्धृत करण्याची, त्याला सुभाषिताचा दर्जा प्राप्त होण्याची, त्या शेराचे भाषेतील  उपयोजन वाढण्याची जी क्षमता शब्दरचनेत येते, तिला कारण त्या शेरात उतरलेला अनुभवाचा अर्क आणि स्वर -व्यजनांची सयमकता त्या शेराला श्रृतीसुलभ उठाव देत असते म्हणून.
स्वरकाफियाची गझल रदीफ नसलेली म्हणजे गैरमुरद्दफ असेल तर त्या गझलचे वाचन गद्यप्राय वाटते. अशा प्रकारच्या गझलांची संख्या म्हणूनच अत्यल्प आढळते. स्वर काफियासोबत असलेला रदीफ  शेराची पद्यात्मक लय  विस्कटू देत नाही, तसेच शेराच्या सानी मिसऱ्याचा शब्दक्रम   वक्राकारही होऊ देत नाही.

शब्दक्रम आणि शब्द सहयोग
_______________________

काव्यप्रकारानुसार शब्दरचनेची प्रत्येक ओळ लहान किंवा मोठी असते.
तो त्या ओळीचा भाषिक अवकाश असतो.
गझलच्या शेरात दोन ओळींचा एक स्वतंत्र,  सेंद्रिय घटक असतो. ह्या घटकात पहिली
ओळ आणि दुसरी ओळ मिळून एक अर्थपूर्ण विधान सादर करीत असतात. त्यातील अर्थवहनाचे माध्यम असतात शब्द. आणि त्या शब्दांच्या 
मुख्यार्थासह असणाऱ्या काही विशेष अर्थच्छटा, शेराच्या अर्थपूर्ण विधानाची अनेकार्थ सूचनक्षमता वृद्धिंगत करणाऱ्या असतात.
शेरातील ह्या दोन ओळींच्या रचनेत दोन तत्त्वे अत्यंत महत्वाची असतात.
अ ) शब्दक्रम
Order of words
ब ) शब्दसहयोग
Association of words.
ओळीतल्या एकाही शब्दाचा क्रम बदलला तरी अर्थप्रवाह अवरुद्ध होतो. आणि विधान अर्थपूर्ण होण्यात बाधा निर्माण होते.
शब्दक्रम योग्य आहे परंतु मधेच एखादा शब्द अर्थवहनाला सहयोग करीत नसेल तरी विधानाचा अर्थ अपूर्ण राहू शकतो.
प्रत्येक शब्द आपल्या स्थानी आधीच्या आणि नंतरच्या शब्दांना तर सहयोगी असावाच लागतो शिवाय दोन ओळींच्या घटकातील सेंद्रिय म्हणजे 
एकजीव संघटनेलाही त्याचा सहयोग कमी पडता कामा नये .
या दृष्टीनेच कवीला उपलब्ध असलेले
शब्दनिवडीचे स्वातंत्र्य लवचिक असणे अपरिहार्य असते.

वाचक सापेक्षता
_____________

आतापर्यंत ज्या मुद्यांचा उहापोह केला, ते सर्व मुद्दे लेखनाच्या अंगाने म्हणजेच कवीच्या बाजूने आपण 
पाहिलेत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा की कवी लिहितो कोणासाठी ?दुर्देवाने
प्रत्येक काळात कवितेचा वाचक अत्यंत मर्यादित राहिला आहे. बहुतांश वेळा कविता लिहिणारा वर्गच कवितेचा वाचक असतो. आणखी छोटासा का असेना पण एक वर्ग केवळ रसिकांचा असतो. त्याची संख्या वाढणे हे आपल्या सांस्कृतिक प्रगतीचे लक्षण असते . पण तसे होताना दिसत नाही. ह्या छोट्याशा निखळ रसिक समुहाला कवितेच्या तांत्रिक चर्चेत काडीचाही रस नसतो. शेर वाचल्यानंतर शेरातील शब्दरचना त्याच्याशी काही संवाद साधणार असेल तर तो शेर -कविता वाचेल. आम्ही आमच्या पद्धतीने लिहू. ज्याला समजून घ्यायचे असेल त्याने आपले भाषिक कौशल्य, आकलन क्षमता वाढवावी, हीच लिहिणाऱ्यांची अपेक्षा कालही होती. आजही आहे. आणि मग कविता ही केवळ विद्यापीठातील मूठभर विद्वानांच्या चर्चेचा आणि आस्थेचा विषय बनून राहिलेली असते.

स्वसंपादन
__________

               अभंग, ओवी ह्या काव्यप्रकारांची शब्दरचनेच्या अंगांनी जशी वैशिष्ट्ये असतात. तशीच ती गझलचीही आहेत. एकेकाळी केवळ अध्यात्म आणि भक्तिभाव व्यक्त करणार्‍या अभंगाला जसा आज सामाजिक जाणीवेपासून तर श्रृंगारापर्यंत एकही विषय वर्ज्य राहिलेला नाही तसेच गझलचेही आहे. आजच्या मराठी कवितेत शेती-मातीतल्या ग्रामीण जीवनानुभवापासून महानगरीय संवेदनापर्यंतचं माणसाचं संबंध जगणं जसं येतं तसंच ते मराठी गझलेतही येतं. गझल हा कवितेचाच एक प्रकार असल्यानं हे घडणं अगदी स्वाभाविक आहे.
रचनेच्या अंगानं दोन ओळींचा शेर हे गझलचे अंगभूत वैशिष्ट्य. दोन ओळीत एक जीवनानुभव उत्कटपणे मांडणारी लघुत्तम कविता म्हणजे शेर. अशा लघुत्तम कवितेची माळ यमकांच्या-काफियांच्या  धाग्यात गझलेमधे ओवलेली असते.
                कवी त्याच्या प्रत्येक कवितेत एकसारख्या गुणात्मक उंचीला पोचणे शक्य नसते. त्याच्या एकूण काव्यलेखनात थोडं अधिक-उणं, डावं-उजवं, उन्नीस-बीसं होत असतं. संग्रहासाठी एकूण कवितांचा विचार करताना कवीला काही कविता संग्रहात समाविष्ट करण्यालायक वाटत नाहीत. त्या कविता बाद होतात. अगदी तसेच गझलमध्ये सुचलेले सर्व शेर म्हणजेच दोन-दोन ओळींच्या कवितांपैकी काही कविता म्हणजेच काही शेर कवी बाद करतो.  महाकवी   गालिब साहेबांनी तर असे तीन हजार शेर बाद केल्याची नोंद आहे. त्यांच्या दोनशे चौतीस गझलांचा संग्रह 'दीवान - ए - ग़ालिब' वाचकांना- समीक्षकांना- शंभर -दीडशे वर्षांना पुरून उरला. त्यांच्या अप्रकाशित दोनशे अठ्ठेचाळीस गझलांचा संग्रह आता कुठे दिल्लीच्या ग़ालिब अॅकेडमीनं उर्दू लिपीत प्रकाशित केला. ह्या सर्व गझला rekhta.org वर उर्दू लिपीत उपलब्ध आहेत. नजीकच्या काळात त्या देवनागरीतही उपलब्ध होतील. त्यातील गझला ग़ालिब यांनी स्वतः आणि त्यांच्या संपादक मित्रांनी भाषेच्या, प्रतिमांच्या, आशय पुनरावृत्तीच्या, दुर्बोध तेच्या अशा कोणकोणत्या निकषांवर बाजुला काढल्या होत्या. हे अभ्यसनीय ठरेल.
                   आधीच्या धावपटूंनी काढलेल्या धावांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी जसे नवे खेळाडू धावसंख्या वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. तशी आपल्या गझलांची संख्या वाढवून उस्तादांच्या गझलसंख्येचा रेकॉर्ड मोडणे हा बालीशपणा आहे. गझललेखन म्हणजे क्रिकेट नव्हे. हे कायम लक्षात ठेवावे आणि दुष्यंतकुमार यांच्या संख्येने केवळ बावन्न गझलांचा आदर्श गुणवत्तेसाठी शिरोधार्य मानावा.

कलाप्रवासात 'शॉर्टकट ' नसतो.
_________________________

                   कलेच्या सर्जनशीलतेतील न्यूनाची ही रुखरुख जोवर प्रत्येक कवी-कलावंताला आहे तोवर आजतागायत झालेल्या निर्मितीहून आणखी चांगल्या सृजनाची अपेक्षा त्या कवी-कलावंताकडून करायला काहीच हरकत नसते. पण हे होताना दिसत नाही. चतकोरभर प्रसिद्घी, नखभर मान्यता आणि गल्ली -बोळातले पाच- सात पुरस्कार मिळाले की, लगेच ‘बन चुके’ पण येतं आणि कवी-कलावंताच्या सर्जन प्रवाहाला वाहते ठेवणारे जिवंत झरे आटू लागतात आणि पुढे घातल्या पाण्याची गंगा वाहू लागते. ती किती दिवस शुद्घ राहणार? 
गझलेची गुणवत्ता पारखताना गझलकाराचे वय, लिंग, पेशा, पदवी,प्रतिष्ठा याचा विचार खरेतर गौणच म्हटला पाहिजे. एखाद्या कौतुकसोहळ्याच्या निमित्ताने तसा उल्लेख होत असेल तर तो  गझलकारांनी औपचारिक तारतम्याने घेतला पाहिजे.
              गझलेची संहिता ज्या भाषा-माध्यमातून सिद्घ होते त्या भाषा-माध्यमाचे प्रगल्भ आणि सम्यक आत्मभान त्या गझलकार-कवीला कोणत्या प्रतीचे आहे हीच गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची मानली पाहिजे. शब्दांची ‘रत्ने’ किंवा प्रसंगी ‘शस्त्रे’ होण्यासाठी जे ‘यत्न’ करावे लागतात. ते करण्यासाठी ‘आह को चाहिए इक उम्र असर होने तक’ इतका धीर धरावा लागतो.
              हिरव्या रंगाच्या सत्तेचाळीस छटा आहेत असं जी.एं.नी एका ठिकाणी लिहिलयं;ते भाषेच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतं. शब्दांच्याही अनेकविध अर्थच्छटा कळायला आणि त्यांचे नेमके उपयोजन जुळायला थोडा वेळ तर लागणारच. तरच दुनियेच्या मनात’ आपलं बिर्‍हाड थाटता येईल.
वाट्टेल त्या लटपटी-खटपटी करून लोकप्रिय होण्याचा ध्यास धरणे, सतत वाचक-श्रोत्यांच्या समोर राहून ‘सुपरडुपर हिट’ होण्याच्या नादी लागणे, वाङमयबाह्य प्रलोभनाने,प्रत्यक्ष लेखनाशी कवडीचाही संबंध नसलेल्या तथाकथित गॉडफादरचे  लांगुलचालन करणे ह्या आणि अशा    अनेक अपप्रवृत्तींच्या आहारी जाऊन ‘मोठं’ होण्याचा ‘शॉर्टकट’ आपल्या सृजनाला अल्पजीवी बनवतो.

आगे आपकी मर्जी
______________

                  'गझलकार सीमोल्लंघन ' च्या संपादनाच्या निमित्ताने नव्या पिढीच्या बऱ्याच उत्तम गझला वाचायला मिळाल्या.
चांगलं कुठेही वाचायला मिळालं की त्याचा आनंद काही औरच असतो. तो तुम्हाला समृद्ध करतो. जीवनाच्या अनेक छुप्या पैलूंशी तुमची जान-पहचान करून देतो. प्रत्येक वेळी तुम्हाला स्वतःकडे पाहण्याची नवी दृष्टी देतो. विविध आयामांनी तुम्हाला वारंवार अंतर्मुख करतो. काव्यकलेची तुमची समज अधिक परिपक्व करतो.

परंपरेच्या संदर्भात नवतेचे अनावरित उन्मेष तुमच्यासमोर प्रकट करतो. नावीन्य- ओरिजिनॅलिटी ही अमरवेलीप्रमाणे बिनामुळाची नसते, ह्याची तीव्र जाणीव वारंवार करून देतो.
                      चार-दोन वर्षे अपघातानं चांगलं लिहून होणं ही गोष्ट वेगळी आणि पाच-सहा दशकं निष्ठेनं स्वतःला पारखत-जोखत-चुकत-दुरुस्त करत-शिकत-घडत जाणं ही साधना निराळी.'मोठं' होण्याची घाई झालेल्या फास्ट फुडच्या जमान्यात खरं तर अशी अपेक्षा ठेवणं हा तद्दन वेडेपणाच ठरावा. पण कवितेचा-गझलचा अगदी अलीकडचा इतिहास सुद्धा याची साक्ष देईल.लिहिता आल्यावर शेरांची,गझलांची,पुस्तकांची संख्या वाढवणं सहजसाध्य असतं,पण पंचवीस वर्षानंतर तुमचे पाच शेर जरी वाचकांना आठवले तरी तुमच्या हातून खरोखर काही चांगलं लिहून झालं होतं,असं समजावं. आगे आपकी मर्जी!
_____________________________________________________


1 comment:

  1. खूप महत्वाचं मार्गदर्शन या लेखातून मिळतं. सतत वाचावा, संदर्भासाठी नेहमी संग्रही असावा असा हा लेख. माझ्यासारख्या गझल साधनेतील विद्यार्थ्यासाठी दिशादर्शक.

    ReplyDelete