प्रसाद माधव कुलकर्णी : तीन गझला

Image may contain: 1 person, smiling, outdoor and close-up

१.
हीच सदिच्छा उरी जपावी नवीन वर्षी
स्नेह फुलांची बाग फुलावी नवीन वर्षी..

व्यक्तित्वाच्या इमारतीची पायाभरणी
अजून बळकट करून घ्यावी नवीन वर्षी..

ह्या हृदयाचे गणित आपण असे सोडवू
'आपुलकी ' हा ठरो लसावी नवीन वर्षी...

रात्रीलाही माझे असते हेच मागणे
पहाटस्वप्ने साकारावी नवीन वर्षी...

सारी दुःख्खे गतकाळाचा भाग ठरावी
आनंदाची पखरण व्हावी नवीन वर्षी...

राग,द्वेष अन मत्सर यांना दूर करोनी
प्रेमरसाची गझल फुलावी नवीन वर्षी...

अजान वृक्षाखाली ज्ञाना हेच म्हणाला
पानोपानी गझल फुलावी नवीन वर्षी...

अभंग,ओवी,दोहा,गवळण,श्लोक म्हणाले
आपण सुद्धा गझल लिहावी नवीन वर्षी...

२.   
मी गेल्यानंतर येथे गझलेला करमत नाही
गझलेला वाटत गेले गझलेची सोबत नाही..

निर्माल्य फुलांचे होते हे मी नाकारत नाही
तरी फुले ओंजळीतली रस्त्यावर सांडत नाही..

मी तुला भेटलो नाही त्याचेही कारण होते
मी त्याग करावा म्हणुनी काहीही त्यागत नाही..

खर्चाची बाजू सुद्धा ही जमेस येते कारण
केलेल्या उपकारांचा मी हिशोब ठेवत नाही..  

अंकुरलेल्या स्वप्नांना मज पहावयाचे होते
मी फक्त उजेडासाठी हा प्रकाश पेरत नाही..

मी तहात हारतानाही जगण्याला जिंकत जातो
यासाठी युध्याच्या मी नादाला लागत नाही..

शब्दांच्या श्रीमंतीचा रखवाला झालो आहे
शब्दाला जपण्यासाठी मी शब्दच टाकत नाही..

सौख्याने माज कधीही करू नये यासाठी मी
दु:ख्खाला माझ्या मधुनी बाजूला काढत नाही..

३.
दुःखास एकट्याला सोडायचे कसे ?
मज एकटेपणाने करमायचे कसे ?

अंधार तू कितीही केलास जीवनी
मी जाणतो कुठेही उजळायचे कसे ..

पाण्यामुळेच झाली ही झीज आपली
हे कातळास आता समजायचे कसे ?

हे ही तुला नको अन तेही तुला नको
तू सांग शेवटी मी वागायचे कसे ?

माझ्या फुटे शिवारी सारेच मीठ मग
डोळ्यात रोज पाणी आणायचे कसे ?

काळीज मी दिलेले होते तुझ्याकडे
जे एकदा दिले ते मागायचे कसे ?

मी रोज व्याज देतो  दिवसा तुझ्याकडे
मेल्याविनाच मुद्दल फेडायचे कसे ?

मी बोललो धगीला तू दूर हो जरा
मेणास ज्ञात असते वितळायचे कसे ?

................................... ........
प्रसाद माधव कुलकर्णी
५३६/१८,इंडिस्त्रीयल इस्टेट,समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी
जि.कोल्हापूर (  ४१६ ११५)
९८ ५० ८३ ०२ ९०

No comments:

Post a Comment