पाषाणाचे कोंदण असते ज्या हृदयाला
त्याच्यासाठी पान गजलचे रद्दी ठरते
गझल समजून घ्यायची असेल तर संवेदनशील हृदयाची दारे सताड उघडी असायला हवीत. ज्यांचे हृदय पाषाणाचे असेल त्यावर गजलेचे मऊ, मुलायम, नजाकत असणारे शेर काय परीणाम करतील ? अश्यांसाठी गजलेचे पान "रद्दी" मोलाचेच असे सांगणारा विजय वडवेराव यांचा हा शेर गझलेची प्रकृती आणि प्रवृत्ती सांगणारा आहे. त्यांचा "चंद्रही पेटेल" हा गझल संग्रह नुकताच प्रसिद्ध झाला असून आपल्या आगळ्यावेगळ्या, स्वतंत्र शैलीने अल्पावधीत त्याने गजलेच्या प्रांतात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
हल्ली सर्वत्र कवितेचे अमाप पीक आलेले असले तरी त्यात कसदार व दमदार कविता अभावाने आढळते. गझलेची परीस्थिती याहून भिन्न नाही. त्यात गझलेचा आकृतीबंध सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत. वृत्त, छंद, मात्रा, लगावली सांभाळत आशयगर्भ शब्दकळा पेरणे आणि गझलियत सांभाळून एखादा शेर सादर करायला कसब पणाला लागते. कवितेत आपला विचार मांडायला खूप मोठा स्पेस असतो. गझलेत यावर मर्यादा येते. प्रत्येक शेर, त्यातला मिसरा हा स्वतंत्रपणे स्वतःची लय सांभाळत नवा विचार, नवी कल्पना मांडत असतो. वडवेराव यांची गजल या कसोटीवर खरी उतरते. ती स्वतःची वेगळी वाट निर्माण करणारी असून पारंपारीक गझलेचे समकालीन प्रतिबिंब व्यक्त करणारी आहे. संवेदनशील शिक्षक, हळवा कवी, तरलभाव मांडणारा गीतकार आणि नवनिर्मितेचा ध्यास असणारा संगीतकार अश्या विविध आघाड्या समर्थपणे सांभाळणारे वडवेराव "चंद्रही पेटेल" च्या माध्यमातून गझलेच्या रसिकांच्या मनावर स्वतःची छाप उमटवायला सज्ज झाले आहेत. पूर्वसुरींचे अनुकरण नाकारून कोणताही एक सूर आळवण्यात धन्यता न मानता शक्यतांचे सारे पदर उलगडू पाहते. त्यांची गझल म्हणूनच वेगळी वाटते. तिच्यात प्रेमाचा अलौकिक अविष्कार आहे, विद्रोहाचा आगडोंब आहे, सामाजिक भान आहे आणि स्वतःचे आत्मभान जपणारे आत्मपरीक्षणही आहे.
प्रेमावर कविता, गझल लिहिली नाही असा कवी, गझलकार सापडणे कठीणच. विरहाचे चटके साहिले नसतील आणि वेदनांची जाण नसेल तर कवी, गझलकाराची रचना कशी फुलणार ? आपल्या प्रेयसीचे दुर्लक्ष आणि तिला भेटण्यासाठी मनाची झालेली तगमग मांडताना वडवेराव असे हळवे होतात.
तुला सखे दुरून मी असे किती बघायचे
मनातल्या मनात मी किती असे झुरायचे
प्रेयसीच्या रुपाचे मनातल्यामनात पारायणे करतांना तिचे ओठ त्यांना गुलाब पाकळ्याच वाटतात. हा गुलकंद चाखण्यात काय आनंद असेल तो प्रत्यक्ष अनुभवायलाच हवा असं धारिष्ट्य ते पुढील शेरातून मांडतात.
तुझे मधाळ ओठ हे, जश्या गुलाब पाकळ्या
पिऊन घोट एकदा, मला तुझे बघायचे
विरहाच्या ज्वालेत पेटण्याचे दुःख एकमेकांच्या मिठीत आल्यावर हलके तर होतेच शिवाय ते मिलनाची साखर पेरणीही करते हे सांगतांना वडवेराव शब्दांची नजाकत किती हळूवारपणे सांभाळतात ते बघा.
दुःख कर हलके मला बिलगून घे तू
तोवरी मी शोधतो ओठात साखर
मिलन हा प्रेमातील सर्वोच्च आनंदाचा आणि सदैव स्मरणात ठेवण्याचा क्षण. तो सुगंधी झाला हे समजल्यावर प्रियकराने विचारलेला भाबडा प्रश्न रसिकाची उत्स्फूर्त दाद घेतल्याशिवाय कसा राहील ?
आज गंधाळतो हा देह माझा
कोणते होते तुझ्या देहात अत्तर
प्रेमाने मन भरेल, पोट भरत नाही, हे वास्तव वडवेराव यांना आहे. त्यासाठी मातीच्या ढेकळावरही प्रेम करा हा सामाजिक भान देणारा सल्ला ते सहज देवून जातात.
घासही भरवेल माती काळजाचा
एकदा तू प्रेम करना ढेकळावर
सासरी जाणाऱ्या कोणत्याही नववधूकडे बघून लेकीची आठवण येणारा बाप उभा करतांना वडवेराव "जागोजागी भेटत असते माझी मुलगी" या प्रदीप निफाडकर यांच्या गझलेशी जवळचे नातं सांगतात.
लग्न मंडपी रडतो, जेव्हा बाप कुणीही
डोळे भरूनी बघतो, माझ्या मुलीकडे मी
निर्मळ, निष्पाप फुलांचे साफल्य त्याच्या निर्माल्य होण्यात आहे. मात्र, रात्री-बेरात्री सजणारा फुलांचा बाजार आणि सभ्यतेचा बुरखा पांघरलेल्यांची तेथे होणारी गर्दी या कटू सत्यावर ते परखडपणे ताशेरे ओढतात आणि समाजाच्या एका वैगुण्यावर सहजच बोट ठेवतात.
होताच रात फुलतो बाजारही फुलांचा
मग सभ्यता जगाची चोरून त्यात वसते
जे अनुभवतो तेच शब्दात मांडतो. माझे अनुभव, दुःख माझे स्वतःचे आहेत. ते कुणाचे पाहिलेले, वाचलेले नाहीत. वरवरचे लिखाण करणाऱ्यांत व आपल्यात हाच फरक आहे हे सांगतांना ते म्हणतात.
तू वाचलीस दुःखे, मी भोगलीत दुःखे
इतका फरक अपुल्या, या लेखणीत मित्रा
आपण कुणाची वेठबिगारी करत नाही. कुण्या कंपूत रमत नाही, ना कुणाची तळी उचलतो. आपली कविता ही अन्याय, अत्याचार, दुष्प्रवृत्तीवर शब्दांचा आसूड ओढतात. मात्र, याला नाकं मुरडणाऱ्यांना ती सोसवत नाही अशी खंतही ते मांडतात.
आसूडासम कविता त्यांना सोसत नाही
वेठ बिगारी कविता मीही खरडत नाही
इतर भाषांमधील रचनांचे स्वैर भाषांतरे करुन संमेलनाचे व्यासपिठ गाजवणाऱ्या तथाकथित विद्वानांची पोल खोल करतांना त्यांच्या त्या स्वयंघोषित उत्सवाला ते पोळ्याची उपमा देवून व्यंगात्मक उपहास करतात.
उर्दूच्या त्या टाळूवरचे करून लोणी गोळा
मराठीत मग खुशाल भरतो विद्वानांचा पोळा
पुढे जाणाऱ्याचे पाय ओढणे, त्याला नाउमेद करणे, दुर्लक्षित करणे अशी सभोवतालची निराशाजनक परीस्थिती पाहून संवेदनशील मन दगड बनते. तरीही एखाद्या कातरवेळी अंतरी विचारांचे काहूर उठते जे फूल फुलण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही ही गझलकारांची आगतिकता हीच त्याची शक्ती बनून समोर येते.
दगड मनाचा केला मी या हाय तरीही
दगडातूनही फूल उमलते कातर वेळी
विजय वडवेराव यांची गजल जीवनाची विविध रुपे समर्थपणे प्रत्येक शेरातून मांडत तिला प्रवाही बनवते. यातील प्रत्येक शेर म्हणजे एक स्वतंत्र आशयसंपन्न, समृध्द कविताच आहे. जिच्यातून सुजाण रसिकाला भावभावनांचा मनोहारी कॅलिडोस्कोप पहायला मिळतो. साधे, सोपे शब्द. नवे विषय, त्यांना दिलेली कलात्मक कलाटणी आणि त्यातून उकलत जाणारे जीवनाचे तत्वज्ञान यांचा सुंदर संगम या गझलांमधून अनुभवायला मिळतो. यातील अनेक शेर वाचतांना त्या आपल्याच भावना आहेत असं वाटून आपसूक मनातून सहज, उत्स्फूर्त दाद उमटते. ही गजलेची परिपूर्णता आहे असे मला वाटते.
वडवेराव यांचे गजलेचं प्रशिक्षण गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या गझलेच्या कार्यशाळेतून झाले आहे. गझलेचे भिष्माचार्य सुरेश भट यांना प्रेरणास्थान मानून व एल्गारची पारायणे करत तीन वर्षात त्यांनी मिळवलेले यश लक्षणीय असून अभिनंदनीयही आहे. स्वतःला संगीताचं ज्ञान असणं आणि शास्त्रीय गायनाची जाण असल्याने त्यांनी स्वतंत्र गजल मैफल साकारण्याचे शिवधनुष्य लिलया पेलले आहे.
समाजात स्वतःचं नाव झालं, प्रसिध्दी, लौकिक मिळाला की लेखक, कलावंत हवेत जातो. ज्या कलेने त्यास मोठं केलं त्या कलेपेक्षा तो स्वतःला मोठा समजायला लागतो. त्याला "ग"ची बाधा होते आणि हीच त्याच्या पतनाची पहिली पायरी ठरते. मात्र, यशाच्या कैफात त्याला ते समजत नाही. इतकं यश, प्रसिध्दी देवू नको असं एका नम्र गझलकाराचं मागणंच त्याचे पाय जमिनीवर असल्याची खात्री देतात.
इतका प्रसिद्ध मीही होवू नये कधी की
माझ्याच मी गजलला गुर्मीत डावलावे
पुण्याच्या प्रतिमा प्रकाशनने प्रकाशित केलेल्या "चंद्रही पेटेल" या गजल संग्रहाला मराठी, हिंदी, उर्दूतील सुप्रसिध्द गझलकार, समिक्षक डाॅ. राम पंडीत यांची अभ्यासपूर्ण साक्षेपी प्रस्तावना आहे. गझलकार रमण रणदिवे यांनी संग्रहाची मुक्तकंठाने पाठराखण केली आहे. संग्रहाचे अंतर्बाह्य स्वरुप देखणं आणि प्रथमदर्शनी प्रेमात पाडणारं आहे. सरदार जाधवांचे मुखपृष्ठ संग्रहात डोकवायला भाग पाडेल असेच आहे.
वडवेराव यांची गझल सत्याची कास धरुन स्वत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. ती वैश्विक भुकेला वळसा घालून कुपमुंडक प्रवृत्तीवर आघात करत आहे. हे धाडस ते "एकला चालो रे" चा मंत्र आळवत करीत आहेत. आपल्या समकालींनांच्या वर्मावर बोट ठेवत त्यांच्या दुखऱ्या जागा जगजाहीर करीत आहेत. यातून ते टिकाकारांच्या टीकेचे लक्षही ठरू शकतात. प्रसंगी कुणी त्यांना आत्ममग्न व फटकळ म्हणण्याचीही भीती आहे. यातून ते एकटे पडण्याची भितीही नाकारता येत नाही. मात्र, या बद्दल ते सजग आहेत. त्यांचे ध्येय निश्चित असून त्यासाठी त्यांनी स्वतःचा मार्गही निवडला आहे. प्रवासाला निघतांना पहिलं पाऊल योग्य दिशेने पडलं तर प्रवासी गतव्यस्थळी पोहोचण्याची शक्यता दृढ होते. तद्वत वडवेराव यांचा गजल प्रवास मला आश्वासक वाटतो.
कोणत्याही क्षेत्रात मी मोठा पंडीत आहे असा गोड गैरसमज कुणाचा झाला तर त्याची प्रगती संपलीच म्हणून समजा. हा अहं ज्याला टाळता आला तो साधकच स्वतःचा उत्कर्ष करु शकतो हा वडवेराव यांचा सल्ला व्यक्तीकडून वैश्विकतेकडे नेणारा आहे. स्वतःसह इतरांना सचेत करणारा आहे. ते म्हणतात...
पांडित्याचा अहं टाळता आला जर का
उत्कर्षाला साधक नक्की लायक ठरतो
आपल्या मर्यादा व शक्तीस्थळं माहित असणारा हा गझलकार गझलेच्या अवकाशावर आपली स्वतःची मोहर उमटवेल याबद्दल गजलेचा एक रसिक म्हणून माझ्या मनात शंका नाही. ती मोहर उमटवेपर्यंत त्याचे पाय असेच जमिनीवर राहतील ही अपेक्षा व्यक्त करुन मी त्यांच्या एकूणच काव्य प्रवासाला आभाळभर शुभेच्छा व्यक्त करतो.
रसग्रहण :
प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
(४२५१०५).
९४२३४९२५९३.
प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
(४२५१०५).
९४२३४९२५९३.
गझलसंग्रह - चंद्रही पेटेल.
विजय वडवेराव.
(९०७५१५९१४२)
प्रतिमा प्रकाशन, पुणे.
पृष्ठ-९६.मुल्य-१५० रु.
विजय वडवेराव.
(९०७५१५९१४२)
प्रतिमा प्रकाशन, पुणे.
पृष्ठ-९६.मुल्य-१५० रु.
No comments:
Post a Comment