राजेश देवाळकर : तीन गझला


१.
धरेची नको ना नभाची नको
मला साथ आता कुणाची नको

इथे सावलीने मला जाळले
करू बात तू या उन्हाची नको

मला दु:ख जगणे शिकवते इथे
फुका आस आता सुखाची नको

लळा लावला मी मुला सारखा
कशी काळजी मग पिकाची नको

जरा बोल तू त्यासही चांगले
स्तुती नेहमी ही स्वत:ची नको

तुला वाटते राज्य यावे तुझे?
निलामी करू मग मताची नको

२.
येत नाही घ्यायला अंदाज वा-याचा
मोह तुजला का तरीही चंद्र ता-याचा

घर तुटायाचेच होते शेवटी तुटले
दोष तर नुसताच नव्हता वीट गा-याचा

आग अजुनी थंड ना झाली चितेचीही
घेतला ताबा मुलांनी सातबा-याचा

दु:ख जळतांना मला याचेच सरणावर
चेहरा ओळखित होतो मारणा-याचा

लागली पेटायला वस्ती कशी इतकी
उदय झाला का नव्या येथे पुढा-याचा

३.
झाकून सुर्य काही अंधार होत नाही
दिवसात काजव्यांचा उध्दार होत नाही

सत्यास टाळुनी जी सोयीनुसार लिहिते
ती लेखणी कधीही तलवार होत नाही

टाकू नकोस शस्त्रे एका पराभवाने
लढल्याशिवाय स्वप्ने साकार होत नाही

मिळणार भाव कैसा शेतातल्या पिकांना
जर आपले कधीही सरकार होत नाही

देशास घडविण्या जे फासावरी लटकले
त्यांचाच आज येथे सत्कार होत नाही

तू भेटण्यास ये पण पत्ता नको विचारू
आम्हा कलंदराचे घरदार होत नाही

.............................................
प्रा. राजेश देवाळकर
बल्लारपूर...
जि.चंद्रपूर
7798926733

4 comments:

  1. आपण आम्हाला इतक्या छान छान कविता सादर करता त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार

    ReplyDelete