हमरी अटरिया पे ... : डॉ. संगीता म्हसकर.

    
बलमवा तुम क्या जानो प्रीत
    मै गयी हार तुम्हारी जीत..
    नेहा लगाके दिल मे समाके..
    फिर भी हुए ना मीत...
           बेगम अख्तर .... यांच्या स्वरातला हा एक दर्दभरा दादरा..! दिवस आणि रात्र यांच्या सीमारेषेवर उभी असलेली कातरवेळ जेव्हा मनाचा तळ ढवळून काढत असते... ओंजळीतून कणाकणाने निसटत जाणारा संधिप्रकाश या जगात आपलं असं काही च नसतं हेसुचवत असतो...!अशा प्रत्येक बेचैन क्षणी अख्तरीबाईंचा हा दर्द साद घालत राहातो मला.. लहानपणापासून मला खेचून घेत आला आहे हा दर्द.. कळत गेलं तसं जास्तच गुंतत गेले मी त्या जीवघेण्या सुरात..!
"हज़ारों महेफिलें होंगी..हज़ारों का़रवां होंगे..
निगांहें हमको ढुंढेगी..न जाने हम कहां होंगे.."
            या शब्दांची पुन्हा पुन्हा आठवण करून देणार्या बेगम अख्तर म्हणजे स्वताच एक मूर्तिमंत गझलचा आविष्कार होत्या."सुरोंका असर " हेच गाण्याचं तत्व मानणारी ;शब्दांचं सौंदर्य सुरांच्या धुक्यात अंधुक होऊन चालणार नाही याचं सतत भान राखणारी;त्यांची गझल अद्वितीय अशी च होती. त्यांचं व्यक्तिमत्त्व देखिल विलक्षण खानदानी ; रुबाबदार आणि वलयांकित.. !
  " ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया
    जाने क्युं आज तेरे नाम पे रोना आया"
              या गझलेतली शब्द सुरांची एकरुपता ही अर्थातच सांगण्याची नाही तर अनुभवण्याची चीज आहे !शब्दातला एक एक भाव रसिकांच्या काळजा पर्यंत पोचवणं आणि तरीही प्रत्येक शब्दावर नाजूक कलाकुसर करणं ; हरकती घेणं ही अत्यंत अवघड गोष्ट अख्तरीबाई किती सहजगत्या करतात ! अर्थात या मागे त्यांची या क्षेत्रातील फार मोठी साधना होती हे विसरून चालणार नाही. बेगम अख्तर या मूळच्या फैजाबादच्या (अयोध्या) रहिवासी ! पेशाने सिव्हिल जज् असणारे त्यांचे वडील; सईद अत्तार महम्मद यांना शायरीची खूप आवड होती.तर आई मुश्तरी बेगम कुशल गायिका ! शायरी आणि संगीत या दोन्ही कलांचा वारसा लाभल्याची चुणूक छोट्या अख्तरीने लहान वयात च दाखवली होती.त्यामुळे आग्रा घराण्याचे उस्ताद इम्दादखान आग्रावाले यांच्या कडे तिची तालीम ही सुरू झाली होती. पण दुर्दैवाने वडिलांचे अचानक निधन झाल्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुश्तरी बेगम यांना फैजाबाद सोडावे लागले.काही दिवसांनंतर त्या अख्तरीला घेऊन कलकत्त्याला गेल्या. कलकत्त्याला तानरस घराण्याचे उस्ताद अता महम्मद खां यांचा गंडा बांधून त्यांचे शिष्यत्व अख्तरीने पत्करले.हा क्षण अत्यंत भाग्याचा ठरला. कारण लहान वयात मिळालेली आग्रा घराण्याची तालीम ; मूळची निसर्गदत्त आवाजाची देणगी आणि उस्तादजींचे अनुभवी मार्गदर्शन यामुळे अख्तरीजींच्या गायनात विलक्षण प्रगल्भता निर्माण झाली.छोट्या मोठ्या मैफिलींची आमंत्रणे येऊ लागली.काही ध्वनिमुद्रिका देखिल प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या किती तरी गझल खूप लोकप्रिय झाल्या.
"वो जो हममें तुम में क़रार था..
तुम्हे याद हो के ना याद हो.."
          ही गझल आज ही मैफिलीत मोठ्या प्रमाणावर सादर होते. "हमरी अटरिया पे आजा रे सावरिया"
हा दादरा देखिल खूप गाजला. नंतरच्या काळात बेगम अख्तर यांनी उर्दू रंगभूमी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतही काम केलं.पण त्यांच्या सुरेल मनाला तिथे फार काळ रमता आले नाही.संगीत मैफिल त्यांना सतत साद घालत होती.संगीत हाच त्यांचा प्राण होता. शिवाय काव्य आणि भाषा यांचं सखोल ज्ञान; रागदारीवर विलक्षण प्रभुत्व; आणि या सोबत कठोर अशी साधना या सगळ्या गोष्टींचा संगम त्यांच्यात असल्यामुळे संगीतातील कुठल्याही प्रकाराची त्यांनी निवड केली असती तरी त्यात त्यांनी एक नवीन वाट नक्की च निर्माण केली असती.
                                     ठुमरी दादरा गझल या क्षेत्रात अर्थात च त्यांनी एक  वेगळा आदर्श निर्माण केला .स्वताचा ठसा निर्माण केला. किंवा या ही पुढे जाऊन असं म्हणावं लागेल की गझल आज ज्या उच्च स्थानावर आहे तिची सुरुवात च बेगम अख्तर यांच्या गझल पासून झाली . यासंदर्भात एक विलक्षण योगायोग असा की किराणा घराण्याच्या ठुमरीचं अख्तरीबाईंना खूप आकर्षण होतं. या ठुमरीची संथ लय ;बड्या ख्याला कडे झुकणारा  तिचा विस्तार आणि मुख्य म्हणजे शृंगारिक भावाऐवजी अध्यात्मिक भाव व्यक्त करणारी ही ठुमरी शिकण्याची त्यांची खूप इच्छा होती.आणि तशी संधी त्यांना प्राप्त ही झाली. किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल वहीद खां यांनी बेगम अख्तर यांना या ठुमरीची तालीम देण्यास सुरुवात केली.योगायोगाने याच काळात सुप्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर देखिल खांसाहेबांकडे ही ठुमरी शिकत होत्या. या दोन्ही गायिकांनी आपापल्या क्षेत्रात दिलेलं महत्त्वपूर्ण आणि समसमान योगदान म्हणजे हिराबाईंनी शास्त्रीय संगीत मैफिलीत सादर करणार्या स्त्रियांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.त्यापूर्वी कुलीन घरातील स्त्रिया मैफिलीत संगीत सादर करत नसत. तर बेगम अख्तर यांनी पूर्वी राज दरबारात प्रतिष्ठेचं स्थान असलेल्या परंतु इंग्रज काळापासून नायकिणींच्या कोठीवर बंदिस्त असलेल्या गझलला संगीत मैफिलीत आणून तिला पुन्हा एकदा मानाचं स्थान आणि प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.
                              बेगम अख्तर यांना पद्मश्री तसेच पद्मभूषण पुरस्कार त्याचप्रमाणे संगीत नाटक अकादमी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अर्थात रसिकांच्या हृदयावर राज्य करण्याचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार या "मल्लिका -ए - ग़ज़ल " ला मिळालेला आहे हे सगळ्यात महत्त्वाचं!
.............................................
डॉ. संगीता म्हसकर.

No comments:

Post a Comment