सुरेश सायत्री किसन धनवे : दोन गझला


१.
उपकाराचे घेवुन ओझे जगलो नाही
अपकारांच्या धमक्यांनाही दबलो नाही

कष्टाच्या मी खात भाकरी आलो इथवर
तळहाताच्या रेघोट्यांवर तगलो नाही

जरी वानवा आहे येथे सज्जनतेची
दुर्जनात ह्या कधीच मित्रा रमलो नाही

रोज ऐकतो धर्म भितीचे पारायण मी
भेद नितीचे वेद कधी मी वदलो नाही

सखे तुलाही दारिद्र्याचे रूप कळावे
म्हणून अजुनी हवा तसा मी सजलो नाही

२. 
विझतांनाही दिवा अचानक भडकत असतो
वातीमध्ये जीव दिव्याचा अडकत असतो

सखे कैकदा तू येण्याची वाट पहातो
तू आल्यावर जीव सारखा धडकत असतो

प्रत्येकाचा धर्म वेगळा,पंथ वेगळा
इथे तिरंगा मनामनावर फडकत असतो

तुझे मटकणे अन् नटणेही भारी असते
रूप पाहुनी सखे आरसा तडकत असतो

नकोस राहू बेसावध तू ग्रिष्मामध्ये
कधी कधी अवकाळी पाउस सडकत असतो

...........................................
सुरेश सायत्री किसन धनवे

No comments:

Post a Comment