राजीव मासरूळकर : पाच गझला


१.
फक्त भासानेच आपण घाबरू शकतो

तो करायाचेय ते, तेव्हा करू शकतो

आज तू वापर मला वाटेल तसले पण
जप, तुला मीही तसे मग वापरू शकतो

हे खरे की पाहिजे वारा जगायाला
वादळामध्ये कुणीही गुदमरू शकतो

सावली करूणाढगांची दे फिरू काळी 
देह आशेवर बळी मग नांगरू शकतो

पेटला हट्टास तर मी जिंकतो नक्की
खेळला राखून आदर तर हरू शकतो

संपली आहे तुझ्या हृदयातली हिरवळ
अन्यथा (?) तेथे मला मी अंथरू शकतो

मी पसारा हा तुला रमवायला केला
नासवू बघशील तर मी आवरू शकतो

२.
कुणा कळलो न कळलो पण  तुला कळणार आहे मी
तुला जाणीव आहे ना, पुन्हा छळणार आहे मी

तुझे स्वागत कराया घर सजवले प्राणपुष्पांनी
फुलांचे सोड तू कौतूक दरवळणार आहे मी

सुखाची हौस पुरवाया धरा कंगाल केली अन्
भुकेखातर उद्या बघ चांदणे दळणार आहे मी

तुझ्या डोळ्यांत हतबलता, पराजय पाहता आला
अता डोळ्यांतुनी माझ्याच ओघळणार आहे मी

इथे आहे, तिथे आहे, चराचर व्यापुनी उरतो
जळे हा देह केवळ पण कुठे जळणार आहे मी

३.
जगायचे जर असेल सुखकर, वाच जरा
होशिलही मग तू ज्ञानेश्वर, वाच जरा

हसणा-या डोळ्यांचे कौतुक खुशाल कर
रडणारे डोळेही सुंदर वाच जरा

अफवा... जाळा, पकडा, मारा... रोज सुरू
वाचवायचे असेल जर घर ... वाच जरा

आनंदी मन, कुशाग्र बुद्धी, सुआचरण
देतो बघ शब्दांचा सागर.... वाच जरा

तुझ्या सभोती जिवंत पुस्तक वावरते
जगणे त्याचे किती भयंकर.. वाच जरा

एक शब्द जन्माचे सार्थक करेलही
एक शब्द करतो का वापर... वाच जरा

४.
मी कोणाचे ऐकत नाही
बहुधा माझी ऐपत नाही

राजनिती ढग शिकून आले
त्यांना माया लागत नाही

शोधूया झाडांचा मेंदू
माणसास तो उमजत नाही

मी कोणाशी भांडत आहे
मी चे तर हे चिलखत नाही?

सुखात नाही कोणी येथे
या स्वर्गाला किंमत नाही

वेगाने वाढत जाते ते
नाते अंतर कापत नाही

ऐक मना तू नवा फोन घे
कॉल तुला बघ लागत नाही

विश्व जरी अंधारकोठडी
ती कोणाला झाकत नाही

विवस्त्र इच्छा घेउन फिरती
लाज कुणाला वाटत नाही

(देशाचा चेहरा बदलला
हा माझा प्रिय भारत नाही)

जे लिहिले ते तुमचे आहे
हे काही माझे मत नाही

५.
मिळे स्वच्छंद जगण्याला तुझा आधार स्वातंत्र्या
तुझे मानू किती आणिक कसे आभार, स्वातंत्र्या!

मुके, बंदिस्त होते, दीन अन् लाचारही होते
तुझ्यायोगे मिळाली जीवनाला धार स्वातंत्र्या!

तुला उपभोगण्याची लत जगाला लागली आहे
कुणीही घेत नाही त्यातुनी माघार, स्वातंत्र्या!

तुझी शक्ती, वजन आम्ही इथे दररोज अनुभवतो
झुकत असते तुझ्यापुढती उभे सरकार, स्वातंत्र्या!

गळा दाबून भरदिवसा तुला लुटतातही काही
तुझे अस्तित्व हे कायम तुला छळणार, स्वातंत्र्या?

तुझ्या जन्मास आहे लाभला इतिहास रक्ताचा
तुझे भवितव्य आम्हाला कुठे नेणार, स्वातंत्र्या?
.........................................................................
राजीव मासरूळकर

1 comment: