संदीप जाधव : दोन गझला



१.
मी कधी म्हटले सहारा पाहिजे आहे
फक्त एखादा किनारा पाहिजे आहे

आस आहे हीच भरकटल्या जहाजाची
भरवशाचा ध्रुवतारा पाहिजे आहे

बाभळीमध्ये अडकलेल्या पतंगाला
क्षणभरासाठीच वारा पाहिजे आहे

ठेवते चिमणी रिकामे पोट पण म्हणते
“चोचभर पिल्लास चारा पाहिजे आहे”

पापण्यांच्या वळचणीला दे मला जागा
मज तुझ्या स्वप्नात थारा पाहिजे आहे

तू भले शब्दांमध्ये उत्तर नको देऊ
एक ओझरता इशारा पाहिजे आहे

विष प्रेमाचे पितो जो तो रडत म्हणतो
ह्या विषावरचा उतारा पाहिजे आहे

शोधला बाजार सारा ह्याचसाठी मी
डिंक काळिज जोडणारा पाहिजे आहे.

२.
जिवंत आहे तुला विसरल्यानंतरसुद्धा
दिवा जळावा जसा विझवल्यानंतरसुद्धा

दुःखाशी मी हातमिळवणी करतो आहे
पुढे सुखाने हात जुळवल्यानंतरसुद्धा

शेवटची ती मला भेटुनी गेली, पण मी
तिथेच आहे घरी परतल्यानंतरसुद्धा

टाचा झाकत मला म्हणाली, "मजेत आहे"
भेगा दिसल्या तिने लपवल्यानंतरसुद्धा

तिच्या चेहऱ्याइतका सुंदर दुसरा नाही
डावा दिसला चंद्र नटवल्यानंतरसुद्धा

निसरट वळणे तुझी पाहुनी पडता पडता
सावरलो मी पाय घसरल्यानंतरसुद्धा

एक पुरानी इच्छा होउन नागिन आता
फणा काढते रोज चिरडल्यानंतरसुद्धा

भीक द्यायला चिल्लर शोधत असतो जो तो
दिवसाकाठी लाख मिळवल्यानंतरसुद्धा

अशीच असते प्रत्येकाची आई मित्रा
'लाडू' वळते 'पाक' बिघडल्यानंतरसुद्धा
...........................................
संदीप जाधव

No comments:

Post a Comment