रत्नमाला शिंदे : पाच गझला


१.
जगण्यासाठी कारण खोटे वापरले
संधीसोबत काही धोके वापरले

कायम जपून केला वापर हृदयाचा
चुकलेलेही काही ठोके वापरले

चित्र स्वतःचे अपूर्ण राहू दिले कुठे
काही काही रंग मी तुझे वापरले

हरवण्यातली मजा वेगळी अनुभवली
मुद्दामच मी जुने नकाशे वापरले

फक्त नफ्यावर नसतेच चालले माझे
बऱ्याचदा मी काही तोटे वापरले

उजेड उसना घेतला कुठे कोणाचा
फक्त जागण्यापुरते तारे वापरले

मनासारखी वाट लावली माझी मी
दुनियेचेही थोडे सल्ले वापरले

मरण्यापूर्वी हालचाल केली थोडी
तुटलेलेही काही वल्हे वापरले

२.
किती जुन्या अन् नकोनको त्या गोष्टी आपण
रोज रोज वाढत जाणारी रद्दी आपण

दुःख तुझे अन् माझे आहे वेगवेगळे
एका झाडावरचे नाही पक्षी आपण

हाच फरक की प्रत्येकाची गती वेगळी
तिथल्या तिथेच लुडबुडणारी गर्दी आपण

काळासोबत आपणसुद्धा बदलत गेलो
तरिही ठरलो केवळ खोटी नाणी आपण

उशिरा कळले हात आपले फाटुन गेले
किती दूरवर रेटत नेली गोणी आपण

काय बुडाले होते ते तर कळले नाही
पुन्हा पुन्हा पण मोजत बसलो खोली आपण

३.
सत्य अजिबात शोधले नाही
मी स्वतःलाच मानले नाही

मी नको तेच घेतले औषध
पण तुझे नाव घेतले नाही

वाचले मी चुकून डोळ्यांना
आणि काहीच वाचले नाही

चूक केली पुन्हा पुन्हा एकच
ताक फुंकून प्यायले नाही

वाट बदलून चाललो आपण
आणि काहीच बदलले नाही

दुःख याचेच वाटते थोडे
दुःख कसलेच वाटले नाही

४.
तुला पहायचा असा नवीन छंद लागला
पुन्हा जगायला मला नवीन श्वास लाभला...

तुझ्यामधे रहायचे कि सांग जायचे कुठे...
तुझ्यातुनी अलग मला जमेल का करायला...

किती ऋतू किती युगे फिरून जन्म घ्यायचे
किती दिलास वेळ तू इथे मला झुरायला ..

तुझ्यात दरवळून मी सुगंध होत जायचे
जमेल का तुला अता पुन्हा तसे फुलायला

तुझ्या उन्हात शेवटी जळून राख राहिली
मिळेल का अता पुन्हा नवी पहाट व्हायला

५.
कुणावरही कधी मी रागवत नाही
मला इतकी मिजासी परवडत नाही

मला हरवून जावे वाटते आहे
तशी जागा कुठेही सापडत नाही

तुझ्यासाठी करावे वाटते काही
उगाचच मी कुणाला डावलत नाही

मला लाचार दिसणे आवडत आहे
मला लाचार असणे आवडत नाही

तुझ्या माझ्या चुका झाल्या किती मोठ्या!
तरी आपण कसे मोठे बनत नाही!

तुझ्याशी फक्त बोलावे तुझ्याबद्दल
तुझ्याशी याच मुद्द्यावर पटत नाही


No comments:

Post a Comment