श्रीराम गिरी : चार गझला


१.
कोण आहे आणखी उत्तम किती;
सांग मित्रा मी इथे दुय्यम किती.

श्रेय हे घेणार नाही एकटा;
दावला तूही इथे संयम किती.

मूक ही झाली तुतारी आज का;
वाजला तेव्हा तुझा पडघम किती.

प्रश्न नाही जिंकलो वा हारलो;
पाहिले दुनियेत आहे दम किती.

दावला अवघा मला हा चित्रपट;
बोलतो आहेस तू मोघम किती.

केवढा प्रतिसाद आनंदास हा;
वेदने आहेस तू निर्मम किती.

गोष्ट आत्म्याची अता झाली जुनी;
चेहऱ्यावर सांग ह्या चमचम किती

२.
जे खरे सारे इथे मटक्यात आले;
साव सगळे ह्या अता धंद्यात आले

मारला तू साप काठीने कुणाच्या;
छान त्याचे नाव वापरण्यात आले.

ते नको जाहीर जे केले इथे तू;
सांग पडद्याआड जे रचण्यात आले.

तथ्य होते केवढे शपथेत राणी;
भंगलेल्या ह्या तुझ्या वचनात आले.

काल होतो मी जिथे आहे तिथे पण;
फार गेला तू पुढे लक्षात आले.

तोडला कोणी कळेना भरवसा हा;
कोण हे, ना सांगता मतल्यात आले.

३.
एक 'ते ' होतील सारे जिंकल्यावर;
कोण परके हे कसे समजेल नंतर.

वाद फांद्याचे खरे मिटतील तेव्हा;
मूळ आहे एक त्याचे समजल्यावर

चंद्र-सूर्याशी सुरू संवाद त्याचा;
पोसला आहे असा तो चिंतनावर.

जाणतो ना फायदा नुकसान येथे;
देव वेडा प्रेम करतो पोरक्यावर.

आग दुनियेची नको ही दाखवू मज;
ठेवले आहेस तूही विस्तवावर‌.

घाव देवा घालुनी जाशील कोठे;
कोरला आहेस अख्खा पुस्तकावर

४.
सूर्यास ह्या धरावे म्हणतो;
धरेस काही  द्यावे म्हणतो.

गझल लिहून पोट भरेल का;
काही काम करावे म्हणतो.

वस्त्र असोत  वा घर खरेदी;
दोघांनी ठरवावे म्हणतो .

वाट अडवून बसला कोणी;
त्या वाटेने जावे म्हणतो.

घसा जाळते कोरड कायम;
घोट उन्हाचे घ्यावे म्हणतो.

व्हावे खिडक्या -दार घराचे;
इतके तुला जपावे म्हणतो.

No comments:

Post a Comment