अॅड. शिवाजी खाडे : तीन गझला

Image may contain: 1 person
१.
बिया मातीत कुजल्या अन गळ्याशी फास आवळले
ढगाने चोरला पान्हा धरेवर दुःख कोसळले

कळेना त्याच वळणावर कसा थबकून गेलो मी
कुणाची आठवण झाली मनाचे पान सळसळले

मनाचा भास होता की सखे जवळून गेली तू...
निखळता स्पर्श अनुभवला सुगंधी श्वास दरवळले

किती दडवून होती ती मनाच्या खोलवर सारे
हसू खोटेच हसताना तिचेही नेत्र गोंधळले

उपाशी बाप झिजताना कुणीही सोबती नव्हते
लटकते प्रेत दिसल्यावर किती हे लोक हळहळले

२.
मिळेना न्याय इथल्या कायद्याने
लिहू चल कायदे आपण नव्याने

बरा होतो कुशीतच मायच्या मी
उगाचच जाहलो मोठा वयाने

किती बघ रंगल्या चौकात चर्चा
जरासे सख्य अपुले वाढल्याने

मनाचा मोगरा गंधाळतो मग
तिला मी लाजतांना पाहिल्याने

तिच्या मी जवळ सुद्धा जात नाही
तिने दुर जायच्या एका भयाने

सुखांचा सोयरा झालोच नाही
व्यथा मज भावकीतच लाभल्याने

३.
नाव माझ्या कोरले हृदयावरी
तूच माझी सोबती...माझी 'परी'

जेवतो दररोज पण मिटते न ती
का अशी ही भूक आहे हावरी ?

सोनचाफ्याचे मला तू फूल कर
चालते निर्माल्यही झालो तरी !

बाप चिंतातूर होतो फार तो
पोरगी जेव्हा कधी नसते घरी

ऊब मायेची मिळे जगण्यास या
मायच्या पदरात ती जादूगरी

व्हायचे होऊन गेले सोड ना...
मी इथे...अन तू तिथे आहे बरी

धर्म, जाती, पंथ जे ना पाळती
तेच येथे माणसे आहे खरी

आज त्याचे पत्र आले वाटते ?
ती अशी जर होत आहे बावरी
............................................
 शिवाजी खाडे, खामगाव
 9405778577

1 comment:

  1. वाह छान झाल्याहेत गझला. हे शेर विशेष आवडले.

    तिच्या मी जवळ सुद्धा जात नाही
    तिने दुर जायच्या एका भयाने

    व्हायचे होऊन गेले सोड ना...
    मी इथे...अन तू तिथे आहे बरी

    ReplyDelete