वसंत शिंदे : पाच गझला



१.
कातरवेळी उठून कोणी चालत जातो
आठवणींचे खारे पाणी ढाळत जातो

कुठून येतो अंगणात हा रोजच पक्षी
गाणे गावुन काळजास या जाळत जातो

फुले उमलली तरी अता ना सुगंध येतो
दिवसामाजी फक्त मोगरा वाढत जातो

दिवस उगवतो निघून जातो सुसाट आता
आणिक मागे धूर नकोसा सोडत जातो

नसते कोणी सोबत त्याच्या तरी कुणाशी
रस्त्याने तो येता जाता बोलत जातो

जिवंत आहे का ते बघतो रोज सकाळी
हलवुन हलवुन मीच स्वतःला उठवत जातो

२.
आठवणींचा पूर अचानक येवुन गेला
एक किनारा माझ्यामधला वाहुन गेला

हाय ! थांबलो उगाच येथे त्याच्यासाठी
दिवस सुगीचा वा-यासोबत निघुन गेला

कुजबुज केली पक्षांनी अन् पहाट झाली
लखलखणारा तारा तेव्हा विझून गेला

आली होती घरटे सोडुन अखेर ती पण
फांदीवरचा पक्षी तोवर उडून गेला

जहाज होते तरी किनारी बुडून गेले
मासा होता पाण्यामध्ये तरून गेला

आभाळाने साथ सोडली त्याची तेव्हा
एक उन्हाळा पावसातही सुकून गेला

कैद कुणीही करू न शकला त्याला कोणी
वारा होता सळसळणारा निघून गेला

३.
का उडाली अंतरीची पाखरे
अन् लटकली या मनाला वाघुळे

तू कशाला वाट माझी पाहिली
जीवना मी थांबलो नाही कुठे

लख्ख तेव्हा मी दिसाया लागलो
काढली मी आतली जेव्हा पुटे

टाकला कोणी खडा डोहात या
राहिले वर येत त्याचे बुडबुडे

तूच तू मिसऱ्यात होती माझिया
बघ हवेतर शेर माझे तू सुटे

जर वळालो त्या तिथे नसतोच तर
आणखी गेलोच असतो मी पुढे

वेगळा होईन का यापासुनी
की सयामी जन्म हा आहे जुळे

रे कशाला तू उगाचच हासला
शेवटी दिसले तुझे मित्रा सुळे

४.
वाचले होते कुठे त्यांनी मला
जोखले होते कुठे त्यांनी मला

फक्त त्यांनी हाय उंची मोजली
मापले होते कुठे त्यांनी मला

मी स्वतः अस्तित्व पुसले माझिये
खोडले होते कुठे त्यांनी मला

मी भल्यासाठीच होतो वाकलो
मोडले होते कुठे त्यांनी मला

मीच केली काल माझी बातमी
छापले होते कुठे त्यांनी मला

पेटलो आगीसवे सरणात मी
जाळले होते कुठे त्यांनी मला

५.
आठवतो का बालपणीचा काळ तुला तो
आठवतो का जत्रेमधला लाल फुगा तो

ज्यावर होती हुकमत माझी .. अंगण होते
माझा होता एकट्याचाच पुरा सुभा तो

ज्याच्यासोबत ऋतू संपला बालपणीचा
आता दिसतो पिंपळ आणिक पार सुना तो

वडाभोवती खेळ खेळलो होतो सारे
झुलतो आहे डोळ्यांमध्ये उंच झुला तो

ज्याच्यावरती धुतले होते कपडे तेव्हा
पाणवठ्यावर अजून आहे दगड जुना तो

नदीपार ज्या नेले होते नावाड्याने
तीरावरती दिसतो आहे बुढा उभा तो

वेशीवरती आहे आंबा वेताळाचा
गावी येता हसून करतो मला खुणा तो

जेव्हा जातो भेटायाला ओढ्याला त्या
सांगत बसतो केलेल्या मी खुळ्या चुका तो

......................................................
वसंत शिंदे , सातारा.

No comments:

Post a Comment