श्रीनिवास गेडाम : तीन गझला



१.
वाटेत जीवनाच्या, काटेच फार होते
हळुवार वेदनांचे, हळुवार वार होते

घालून मान खाली, सारेच सोसले मी
डोळ्यांस आसवांचे, जडले विकार होते

केली कुठे कधी मी, जवळीक भेकडांशी
मी टाळले जयांना, रणछोड यार होते

अपराध लाख ज्यांचे, पोटात घातले मी
त्यांनी मनावरी या, केले प्रहार होते

झेलून रोज ताणे, पोटास जाळले मी
लवणास जागणारे, जगणे भिकार होते

हरलो जरी इथे मी, मज खंत ना कशाची
जे जिंकले जरासे, तेही टुकार होते

होते टुकार जे जे, तेची हुशार ठरले
पदरात माप माझ्या, पडले सुमार होते

२.
येतेस समोरी जेव्हा, ह्रदयाची धडधड होते
नजरेस तुझ्या भिडतांना, नजरेची पडझड होते

त्या चंचल वीजेवाणी, चमकून जराशी जाशी
आलीस इथे सांगाया, मेघांची गडगड होते

डोहात तुझ्या नयनांच्या, मी सूर कसा मारावा
अंदाज तुझा घेतांना, बघ अजुनी गडबड होते

तू श्वास सखे ह्रदयाचा, हळुवार तुला मी जपतो
तुजवाचून अता जगणे, मज पुरते अवघड होते

तू जवळ इथे असतांना, मन उपवन बहरुन येते
जातेस घरी तू जेव्हा, अवकाळी पतझड होते

३.
हसता मला न आले, रडता मला न आले
जुळवून या जगाशी, जगता मला न आले

ही आग अंतरीची, जळते अजून आहे
गेली चिता विझोनी, विझता मला न आले

आजार जीवघेणे, मरणासवेच गेले
व्याधीशिवाय येथे, जगता मला न आले

दर्ग्यापुढे कुणाच्या, झुकलो कधीच नाही
धोंड्यास देव करुनी, पुजता मला न आले

झाला रुमाल ओला, अश्रूत रोज त्यांच्या
माझ्याच आसवांना, पुसता मला न आले

मी ठेवले स्वतःला, हटकून दूर त्यांच्या
गर्दीत मेंढरांच्या, घुसता मला न आले

........................................... 
श्रीनिवास गेडाम 
C/o. मुनिश्वर बोरकर पत्रकार
रामनगर, हनुमान मंदीर, गडचिरोली 442605 
9834773245

No comments:

Post a Comment