डॉ.स्नेहल कुळकर्णी : पाच गझला



१.
घे पारखून वेडया माझा वकूब आधी
देऊ नकोस तोवर कुठली मला उपाधी

आहे प्रपंच मागे अजुनी स्विकारलेला
संन्यस्त जाहल्यावर लावेन मग समाधी

निष्काम बोध येथे केलास माधवा तू
बसली रुसून तिकडे वृंदावनात राधी

किरणात सावलीला केले दफन रवीने
मयतावरी उन्हाच्या नव्हती तिरीप साधी

गर्भात तृप्त केल्या तुम्ही प्रगाढ इच्छा
जडली अपूर्णतेची मग जन्मजात व्याधी

२.
तुझ्या विश्वात दुःखाला असावी यायला बंदी
जवळ येताच तू जाते व्यथा होऊन आनंदी

विजा पडल्या तरीसुद्धा सरींचा तोल सावरते 
हवे तेंव्हाच कोसळते तुझे आभाळ स्वच्छंदी

दिसत नाही कुठेही तो असा निःसंग निर्मोही
झुलीवाचून आढळतो महादेवापुढे नंदी

गुलाबी लाल रंगाची छटा गेली तरीसुद्धा
हवासा वाटतो आहे तुझा सहवास गुलकंंदी

लढत ..म्हणता क्षणी अपुली जगाला आठवण यावी
अशी रंगावी हे मृत्यो ..यमासंगे जुगलबंदी

३.
आश्वस्त अनुभवांवर राहून सांजवेळी
प्रारब्ध ठेवले मी झाकून सांजवेळी

अगदीच हद्द झाली बेशिस्त वागण्याची
गेलास तू पसारा टाकून सांजवेळी

सूर्यास्त पाहिल्यावर जातील सर्व निघुनी
राहील फक्त आभा थांबून सांजवेळी

दिवसा तुझ्याविना मी त्रागा भयाण करते
होते बिकट अवस्था याहून सांजवेळी

विक्राळ  सावल्यांचा पाहून नाच भवती
निःस्तब्ध राहते मी ठरवून सांजवेळी

असतो पहाटवेळी दोघांमधे  सलोखा
जाते तुझी उपेक्षा रडवून सांजवेळी

अंधारले म्हणू की ..आहे उजेड थोडा
बुद्धी खरेच जाते बिचकून सांजवेळी

असते हवी तुला मी रोजच नवी नवेली
मग ठेवते स्वतःला सजवून सांजवेळी

टाळीत ज्यास आले ऐटीत भरदुपारी
मोहात ऊन गेले पाडून सांजवेळी


४.
जीव जाताना कुणावर भार ओंकारा नको
अंत्यसमयी देह अगदी जख्ख म्हातारा नको

घे जवळ ओढून घे ना ताकदीने आणखी
घट्ट दोघांच्या मिठीतुन जायला वारा नको

मंदिराविन पाहिजे तर देव राहू दे इथे
देव नसलेला कुठेही फक्त गाभारा नको

एकदा गोंजारुनी दे..सोडुनी दुःखी व्यथा
सांत्वनाचा बापडीवर व्हायला मारा नको

लग्नवेदीच्या ठिकाणी सांगते दाटी नको
एक मी अन् एक बस तू व्यर्थ डोलारा नको

तेवढे वर्चस्व अपुले  इंद्रियांवरती हवे
व्हायला आला तरीही व्यक्त फणकारा नको

साक्ष देताना शिवाची घेतल्यावर आण मी
आणखी उचलायला मग बेलभंडारा नको

५.
खालमानेने कुणाचा घेतला आधार नाही
वेदना उंची मनाची..एवढी लाचार नाही

ऊन येता वळचणीला..भाजते अंगांग सारे
सावलीला तापण्याचा..मानवी अधिकार नाही

व्यर्थ का देतोस धमकी एकटीला सोडण्याची
मी कुणाच्या भरवशावर थाटला संसार नाही

तत्ववेत्ता होउनी का..काढतो मुर्खात सहजी
जाहला माझ्यावरीही..फालतू संस्कार नाही

प्रेमवेडे पाय दोन्ही..रोखले मी ताकदीने 
ठोस पुढच्या पावलाने..घेतली माघार नाही

फक्त जुजबी ओळखीवर..ओसरी माझी हवी का..?
वाटला होता मला तो ..तेवढा दिलदार नाही

रक्त आले कातळातुन..घाव माझे सोसताना    
शिल्प हाती घेतलेले जाहले साकार नाही

नेहमी त्याच्याप्रमाणे..खोळ माझी टाचली मी 
मात्र पुरुषाने कधीही.. सोडला आकार नाही

मागचे संदर्भ जितके...ठेवतो ध्यानात मेंदू
तेवढा रक्तात माझ्या..उतरला व्यवहार नाही
.............................................

डॉ.स्नेहल कुलकर्णी
गारगोटी 9922599117

4 comments:

  1. सर्व गझल अप्रतिम

    ReplyDelete
  2. सगळ्याच गझल वेगवेगळ्या आशयाच्या, खूप छान. वाह वाह

    ReplyDelete