इस्लाह अर्थात परिष्करण : घनश्याम धेंडे



                     


 उस्तादाने आपल्या शिष्याच्या रचनेत गरजेप्रमाणे फेरफार करून ती अधिक सुंदर करणे म्हणजेच इस्लाह. ग़ज़लच्या प्रवासात चुकीच्या मार्गाने जाण्यापेक्षा वाट कुणाला तरी विचारणे हे जास्त श्रेयस्कर. याच विचारसरणीतून ‘इस्लाह’ म्हणजेच परिष्करण ही संकल्पना जन्माला आली आणि ग़ज़लच्या उत्कर्षांला साहय़भूत ठरली. उस्तादाने आपल्या शिष्याच्या रचनेत गरजेपुरते फेरफार करून ती अधिक सुंदर करणे म्हणजे इस्लाह. ही परंपरा उर्दू काव्यात खूप जुनी आहे. ग़ज़ल आपण उर्दूमधूनच घेतली, मग ही चांगली परंपराही घ्यायला काय हरकत आहे?

                            उर्दू भाषेत ग़ज़लमध्ये उस्ताद जाणकारांकडून ग़ज़ल इस्लाह (परिष्करण) करण्याची आणि करून घेण्याची प्रथा उर्दू ग़ज़लच्या जन्मापासून चालत आलेली आहे. ग़ज़लचा शेर रचणे तितकेसे अवघड नाही; परंतु ग़ज़लचा शेर समजणे हे ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. ग़ज़लविषयी प्रेम, आवड आणि परिश्रम यामुळे शेर रचण्याचा सराव किंवा अभ्यास कदाचित होऊ शकेल; परंतु शेर समजणे, त्याची पारख करणे, शेराचे गुण-दोष कळण्याची समीक्षणात्मक दृष्टी असणे ही अतिशय दुरापास्त अशी गोष्ट आहे. जरी नीर-क्षीर विवेकबुद्धी असली तरी ग़ज़लच्या शेरातील दोष काढून ते दर्जेदार चमकदार उच्च कोटीचे करणे हे प्रत्येकाला साधेलच असे नाही. सोन्याच्या खरे-खोटेपणाची पारख सराफ करू शकेल; परंतु सोन्यातील हीण काढून ते शुद्ध करणे हे फक्त जातिवंत सोनारच करू जाणे. 
                                     इस्लाह करण्याची क्षमता केवळ छंदशास्त्र, अलंकारशास्त्र आणि साहित्यशास्त्रामध्ये पारंगत झाल्याने येत नसते, तर त्याकरिता शायराना वृत्ती, समज, अनुभव आणि सारासार विवेकबुद्धी असणे अत्यंत आवश्यक आहे. इस्लाहमुळे फक्त शिष्यालाच फायदा होतो असे नाही, तर त्यामुळे इस्लाह करणाऱ्या गुरूचाही अभ्यास, स्वाध्याय होत असतो. त्यामुळे गुरूच्या स्वत:च्याही काव्यप्रतिभेला तेज चढत असते. नित्य-नूतन गोष्टींचा, विषयाचा अभ्यास करून माहिती मिळविण्याची प्रवृत्ती वाढीस लागते, जेणेकरून तो आपल्या शिष्यवर्गाला त्यांच्या ग़ज़ल लेखनात मार्गदर्शन करून पारंगत करू शकेल. मोठमोठय़ा उस्ताद शायरांना मुद्रित किंवा लिखित शायरीवरून ते काय लिहितात आणि कसे लिहितात हे कदाचित कळू शकेल; परंतु त्यांची समीक्षणात्मक दृष्टी आणि समज यांचे अनुमान त्यांनी केलेल्या परिष्करणावरूनच करता येईल, की शिष्याने काय लिहिलेय आणि त्यांच्या गुरूने किंचितमात्र सुधारणा करून त्या लिखाणाचे कसे सोने केलेय. 
काही महाभाग मात्र इस्लाह हे शिष्याकरिता वर्ज्य आणि अहितकर आहे असे समजावतात. यावर त्याचे असे म्हणणे आहे की, इस्लाहच्या बंधनामुळे तो शिष्य स्वत:च्या विचारभावना व्यक्त करू शकत नाही आणि तो गुरूचे अंधानुकरण करू लागतो. तो आपल्या कल्पना व्यक्त करण्याची क्षमता घालवून बसतो आणि गुरूचा आश्रित होऊन जातो; परंतु ही अतिशय भ्रामक अशी कल्पना आहे. पशू, पक्षी आणि मानव हे सारेच जण आपल्या प्राथमिक अवस्थेत आपल्यापेक्षा समर्थ आणि अनुभवसंपन्न जाणकारांकडून शिकण्यासाठी विवश असतात. पक्ष्यांची पिले आपल्या आईबापाकडून खाणेपिणे आणि उडण्याची कला शिकतात, तेव्हाच ते स्वच्छंदपणे आकाशात विहार करू शकतात. प्राणी आपल्या पिलांना प्रेमाने चाटून, दूध पाजून स्वत:च्या पायावर उभे राहायला शिकवतात आणि मानवाला तर जन्मापासून मृत्यूपर्यंत कुणा ना कुणाकडून काही ना काही शिकावेच लागत आलेले आहे.
                             मीर, गालिब, मोमिन, जौक, मुहसफी इत्यादी थोर मान्यताप्राप्त आणि ख्यातकीर्त शायरांनीसुद्धा आपल्या उस्तादांकडून इस्लाह करून घेतलेली आहे; परंतु त्यांनी केवळ आपल्या गुरूचे अंधानुकरण केले, स्वत:चे अनुभव व्यक्त करायला ते असमर्थ होते, ते स्वावलंबी न राहता त्यांना कुबड्यांचा आधार घ्यावा लागला असे कोण म्हणेल? 
                         मिर्जा दागसारख्या रंगेल उस्तादाचे जवळ जवळ दोन हजार शिष्य होते. ज्या शिष्यांना त्यांच्या रंगेल शैलीची आवड होती ते त्या शैलीत लिहीत राहिले; परंतु सर इकबाल, सीमान शकबराबादी, जिगर मुरादाबादी, जोश मलसियानी हेसुद्धा त्यांचेच शिष्य होते; परंतु त्यांनी आपली वेगळी शैली का निवडली? सांगण्याचा उद्देश एवढाच की, इस्लाहचा प्रकाश शिष्यांना त्यांच्या ध्येयमंदिराप्रत न्यायला साहाय्यक होतो; परंतु त्याकडे डोळेझाक करून एखादा खड्डय़ात पडला, तर त्यात प्रकाशाचा काय दोष? 
                           अननुभवी उस्तादाकडून इस्लाह करून घेणे म्हणजे अर्धशिक्षित, अर्धवट वैद्याला नाडी दाखवण्यासारखे आहे. इस्लाह देणे हे मोठे कौशल्याचे काम आहे, म्हणून नेहमी प्रामाणिक आणि सिद्धहस्त गुरूकडूनच इस्लाह करून घेतले पाहिजे, जेणेकरून ग़ज़लचे वास्तविक मर्म कळेल आणि या कलेमध्ये प्रावीण्य प्राप्त करता येईल. लायक उस्तादाकडून इस्लाह करून घेतल्याने विचार परिपक्व होतात. ग़ज़लच्या सूक्ष्मातिसूक्ष्म अंगाचे ज्ञान मिळते आणि अनेक बारकाव्यांची ओळख होते. राज अहसनी हे स्वत: उस्ताद म्हणूनही ख्यातकीर्त होते. त्यांचा पुढील शेर पहा..
हमारे आशियाँसे आस्माँ रोक ही क्या थी
बलाए बर्क से महफूज क्यों कर आशियाँ रखते?
खरे तर फारच सुंदर शेर आहे; परंतु जोश मलसियानीसारख्या अनुभवी आणि सिद्धहस्त समीक्षकाच्या नजरेतून या शेरामधली छोटीसी चूक निसटली नाही. वास्तविक वीज आकाशातून जमिनीवर पडते. म्हणजेच विजेच्या उगमाचा उल्लेख आधी आणि नंतर जिथे कुठे कोसळली त्या स्थानाचा उल्लेख व्हायला हवा. त्यामुळे त्यांनी उला मिसरा कसा बदलला पहा..
रुकावट कौन सी थी चर्ख से शाखे नशेमन तक
बलाए बर्क से महफूज क्यों कर आशियाँ रखते?
                           अनुभवाच्या कमतरतेमुळे कधी कधी अशा चुका मोठमोठय़ा उस्तादांकडूनही घडत असतात. आणखी एक उदाहरण पहा (मी मुद्दाम उर्दू ग़ज़लमधील उदाहरणे देत आहे, कारण मराठीत इस्लाह पद्धत म्हणावी तितकी रुजलेली नाही आणि ती रुचलेलीही नाही.)
                             एकदा मिर्जा सुलेमान जाह अंजुम आपले उस्ताद हैदरअली तवातबाई नज्म यांच्याकडून आपल्या ग़ज़लवर इस्लाह करून घेऊन रस्त्याने जात होते. वाटेत नवाब अख्तर बेगम यांना सलाम करावा, म्हणून ते बेगमच्या महाली गेले. बेगमसाहेब स्वत: शायरा नव्हत्या, परंतु जाणकार रसिक मात्र नक्कीच होत्या. त्यांनी अंजुमपाशी एखादी नवीन ग़ज़ल पेश करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांनी आपली नुकतीच इस्लाह केलेली ताजा ग़ज़ल ऐकवली. जेव्हा शायर अंजुम यांनी पुढील शेर ऐकवला..
दम मेरा निकला तेरे वादे के साथ
तेरी घबराई हुई.. हाँ की तरह
तेव्हा बेगमसाहेबांनी हसून विचारलं, काय तिने घाबरून हाँ म्हटलं? अहो, हा शेर असा पाहिजे..
दम मेरा निकला तेरे वादे के साथ
तेरी शर्मायी हुई हाँ की तरह
या शेराला उस्तादांनी इस्लाह तर दिली होती; परंतु स्त्रीसुलभ आविर्भावाचा अनुभव नसल्याने ते फसले होते. ग़ज़्ाल अथांग सागर आहे. पट्टीचे पोहणारेसुद्धा येथे गटांगळ्या खातात. हातिम हे एक आपल्या काळातले चांगले उस्ताद असलेले शायर होते. एकदा ते आपल्या शिष्यवर्गासमवेत बसले होते. कुणाच्या फर्माईशीवरून त्यांनी आपल्या ग़ज़लचा मतला सादर केला..
सर को पटका है कभू, सीना कभू कूटा है
रात हम हिज्र की दौलत से मजा लूटा है
शिष्यवर्गामध्ये मियाँ सदाअत यार खाँ रंगी हेही बसलेले होते. ते आदरपूर्वक म्हणाले, उस्ताद मतला तर छानच जमलाय, परंतु दुसऱ्या मिसऱ्यामध्ये थोडय़ाशा बदलाची आवश्यकता वाटतेय. उस्तादांनी विचारले, काय बरे? रंगी यांनी नम्रपणे म्हटले, माझ्या अल्पमतीप्रमाणे दुसरा मिसरा (सानी) असा हवाय..
सर को पटका है कभू, सीना कभू कूटा है
हमने शबे हिज्र की दौलत से मजा लूटा है
                उस्ताद हातिम यांनी ध्यान देऊन पाहिले तेव्हा त्यांच्याही लक्षात चूक आली की, ‘हम लूटा है’ ही अशुद्ध रचना आहे. ‘हमने लूटा है’ असेच म्हणायला पाहिजे. त्यांनी रंगी यांनी दिलेली इस्लाह कबूल करून सर्व शिष्यांसमोर रंगी यांची स्तुती केली. आपण इस्लाह देणाऱ्या उस्तादांची काही कर्तव्ये पाहू..
-शिष्याचे मौलिक विचार किंवा कल्पनेमध्ये परिवर्तन न करता फक्त ग़ज़लच्या ओळीतील शब्दार्थाचे दोष दूर करून तो शेर दर्जेदार करण्याच्या दृष्टीने शब्दांचे परिवर्तन वा परिवर्धन करावे.
-शिष्याचे विचार अस्वाभाविक खालच्या दर्जाचे वाटत असतील आणि शेराची बांधणीही शिथिल असेल, तर तो शेरच काढून टाकावा आणि त्या ठिकाणी नवीन शेर लिहिण्यास सांगावा. त्यामुळे शिष्याच्या अभ्यासात भर पडेल.
-शेर इस्लाह करताना त्याचे कारण शिष्याला सांगायला हवे. त्यामुळे भविष्यात त्याच्याकडून पुन्हा तशी चूक होणार नाही.
- कुठल्याही परिस्थितीत शिष्याला स्वत:चा शेर देऊ नये, कारण या सवयीमुळे शिष्याची प्रगती खुंटते व तो परावलंबी होण्याची शक्यता वाढते.
- इस्लाह देताना खालील बारकाव्यांचं कटाक्षानं पालन करावं.
अ) शेराची बांधणी आकर्षक आहे की शिथिल हे पाहणं.
ब) शेर, शब्दार्थाच्या दृष्टीनं आणि भाषासौंदर्याच्या दृष्टीनं परिपूर्ण आहे किंवा नाही.
क) शेरांचे बाह्य आणि आंतरिक रूप सुंदर आहे किंवा नाही.
ड) ग़ज़लच्या व्याकरणाच्या दृष्टीने काही त्रुटी आहेत काय?
इ) काफिया व रदीफ यांचा यथायोग्य वापर केला आहे का?
ई) शेरात ग़ज़लियत आहे की नुसतेच शब्दांचे अवडंबर आहे.
                                उर्दू शायरीमध्ये इस्लाह (परिष्करण) करण्याचा रिवाज किंवा गुरू-शिष्य परंपरा चालत आलेली आहे. शिष्य मग तो बादशाहा असो किंवा नवाब अथवा कितीही का प्रतिष्ठित व्यक्ती असेना आपल्या गरीब आणि सर्वसामान्य व्यक्तिमत्त्वाच्या गुरूचा अतिशय आदर करीत असे. बहादूर शहा जफर, नवाब, आसफउदौला, वाजिद अलीशाह, नवाब हैदरराबाद, नवाब रामपूर हे आपल्या पदरी पाठवलेल्या पगारी उस्तादांचा तेवढाच आदर करीत जेवढा एखादी सामान्य व्यक्ती महापुरुषाचा ठेवीत असते.
                            एकदा एका उस्ताद शायराच्या घराला आग लागली तर त्याचा शिष्य आपलं स्वत:चं जळत असलेलं घर विझवायचं सोडून आपल्या उस्तादाचं घर वाचवायला धावला. कारण घर काय किंवा इतर चीज, वस्तू काय कधीही परत मिळतील, परंतु उस्तादची शायरी, त्याचे दिवान कुठं मिळणार? केवढी ही श्रद्धा.
शिष्य मग तो कितीही का पट्टीचा शायर असेना तो आपल्या उस्तादला दाखविल्याशिवाय मुशायऱ्यात ग़ज़्ाल सादर करीत नसे किंवा कुठं प्रकाशित करायलाही पाठवीत नसे, अगदी जोपर्यंत उस्तादचा इस्लाह (परिष्करण) करून परवानगी देत नाही तोपर्यंत. मुशायऱ्यामध्ये, शिष्यगण उस्तादांच्या आधी गजल रचना सादर करीत. उस्तादांच्या नंतर गजल सादर करणं हे उद्धटपणाचं, निषिद्ध मानलं जात असे. कुणी कितीही विनंती केली तरी उस्तादनंतर शिष्य आपली रचना सादर करीत नसे.
                       एकदा प्रख्यात शायर नासिख ह्यांची ग़ज़ल मीर तकीने इस्लाह करून दिली नाही. तेव्हा नासिखने ठरविले की आपली ग़ज़ल आपणच परिष्कृत करून सुधारायची. नासिख ग़ज़ल रचायचा आणि ठेवून द्यायचा. काही दिवसांनी ती गजल वाचून पाहायचा, त्रुटी लक्षात आली तर सुधारायचा अन् ठेवून द्यायचा. असा क्रम, त्याचं स्वत:चं समाधान होयीपर्यंत चालू असायचा. एक मात्र खरं ग़ज़ल होत नाही ती करावी लागते. स्वत:च्या ग़ज़ल पुन:पुन्हा वाचून सुधारणा करता येतात. हा एकप्रकारे गायकाप्रमाणे ग़ज़ल लेखनाचा रियाज आहे. ग़ज़लची सगळी अवधानं पाळायला गजलकार अष्टावधानीच हवा.
                           स्वत:च्या ग़ज़लचं परिष्करण स्वत:लाच कसं करता येतं. त्याबद्दल माझ्याच एका ग़ज़लमधील एका शेराचं उदाहरण घेऊ. सुरुवातीला लिहिला तेव्हा शेर असा होता.
लिहून झाली तरी वाटते अपुरी अधुरी अजूनही 
अडून बसली मधेच एका चरणावरति एक ग़ज़ल
                          तसा वाचताना ऐकायला हा शेर चांगला वाटायचा. परंतु अडून बसली आणि मधेच एक हे गद्यप्राय शब्द मनाला खटकत होते. एके दिवशी अडूनसाठी रुसून हा शब्द सुचला. हा शब्द मात्र ग़ज़लच्या नाजूक प्रकृतीशी जवळीक साधणारा वाटला. आता राहता राहिला तो मधेच एका हा अष्टमात्रिक गट आणि वाचता वाचता अचानक त्याच वजनाचा सरस्वतीचा हा शब्द सुचला. आता ती ओळ झाली - रुसून बसली सरस्वतीच्या चरणावरती एक ग़ज़ल

                     हे शब्द लिहिताच ग़ज़ल एकदम वरच्या पातळीवर गेल्यासारखं माझं मलाच वाटू लागलं. मी स्वत:चीच पाठ थोपाटली. एके दिवशी बुद्धजयंतीच्या कार्यक्रमात हीच ग़ज़ल सादर करायची असं ठरवलं. तेथे मात्र सरस्वतीच्या हा शब्द रुचणारा नव्हता. पुन्हा थोडासा ताण दिला आणि त्याच वजनाचा तथागताच्या हा अष्टमात्रिक शब्द सुचला, आणि शेर असा झाला.
लिहून झाली तरी वाटते अपुरी अधुरी अजूनही 
रुसून बसली तथागताच्या चरणावरती एक ग़ज़ल

                       ह्या शेराला जी दाद मिळाली ती अजून माझ्या स्मरणातून गेलेली नाही. आम्ही एखाद्या तथाकथित मोठ्या शायराचा मान ठेवण्याकरता ग़ज़ल ऐकतो आणि खटकली तरी गप्प बसून राहतो. परंतु समोरचा शायर हा काही देवदूत नसतो. एखादा शब्द खटकला तर बिनदिक्कत सांगावा. आपल्याही विचारात त्यापेक्षा चांगला शब्द असू शकतो. काय?
परिष्कृत शेर -
दम मेरा निकला तेरे वादे के साथ
तेरी शर्मायी हुई हाँ की तरह


सर को पटका है कभू, सीना कभू कूटा है
हमने शबे हिज्र की दौलत से मजा लूटा है


लिहून झाली तरी वाटते अपुरी अधुरी अजूनही 
रुसून बसली तथागताच्या चरणावरती एक ग़ज़ल 

___________________________________________________
( लोकसत्ता दि.९ जाने. २०१५ वरून साभार )


1 comment: