रमेश निनाजी सरकाटे  : तीन गझला

Image may contain: 1 person, smiling, close-up

१.
कर्ज बोजा वाढलेला सातबा-यावर किती
आत्महत्या रोखण्या मुलगा पहा-यावर किती

बैलजोडी पण उपाशी दावणीला बांधली
कोरड्याठण घागरी दिसती किना-यावर किती

नापिकीने गांजलेले अन्न पाणी सोडती
शासनाची जबर वसुली शेतसा-यावर किती

पावसाळा हूल आम्हा देत गेला नेहमी
नाडलेली भावकी; राहू सहा-यावर किती

नोटबंदी निर्णयाने हाल झाले आमचे
फरक पडला सांग या नेत्या पुढा-यावर किती

दाळदाणा ,कापसाला भाव नसतो नेमका
कर्ज माफी उंच उडते फक्त वा-यावर किती

नाडलेल्या जिंदगीचे तीन तेरा वाजले
गायिले बेसूर गाणे एकता-यावर किती

२.
घालू गळ्यात आम्ही त्यांच्या गळा कधीही
करतील आमुचा जे राखन मळा कधीही

धरणात आमची पण गेली जमीन सारी
पाणीच येत नाही घरच्या नळा कधीही

दु:खात पाहुनी ते जाती पळून सारे
कामास येत नाही गोतावळा कधीही

हिजड्यास लाख वाटे आई खरेच व्हावे
येतील काय त्याला प्रसुति कळा कधीही?

बेकार माणसाला करतात दूर सारे
लावे न कोण त्याला नसता लळा कधीही

आहोत शिष्य आम्ही सिद्धार्थ गौतमाचे
 वै-यास देत नाही आम्ही झळा कधीही

३.
गणंग होता पिचून गेलो नसे मनाला उमंग आता
तुटून सैराट होतसे -वादळात ला मी पतंग आता

अमीर झाली उमेद माझी जहाल अभिमान पाळताना
घरात आहे जरी भुकेले -नशीब माझे भणंग आता 

जिवंत असता खुशीत गुणगान गायचे जे हजार वेळा
फितूर, मेल्यावरी चघळती - कितीक चर्चा खमंग आता

पुन्हा पुन्हा नाडती मला ते बघून मज फाटका भुकेला
धरू कशाला भिती कुणाची- गरीब ना मी, दबंग आता 

दिवस उगवला,उजेड आला घरोघरी शिक्षणा मुळे अन्
भिमा मुळे जिंदगीत माझ्या- मधूर उठती तरंग आता

लुटून खाती बनून साधू कितीक लुच्चे तथा लफंगे
समाज सारा सुधारण्याला, हवे तुक्याचे अभंग आता

................................................................................
रमेश निनाजी सरकाटे
भुसावळ
9967330465

No comments:

Post a Comment