गझलविषयी थोडंसं मनमोकळं... : सौभद्र



रोज शब्दांची नव्या बांधून मोळी
मी लिहू बघतो गझलच्या दोन ओळी...

गझल लिहिण्यासाठी कुठल्याच कार्यशाळेत न गेलेला मी 'गझल बाराखडी' पासून सुरूवात करून हळूहळू अनेक मार्गांनी, अनेक व्यक्तींकडून अजूनही गझलेविषयी नवनव्या गोष्टी माहित करून घेतोय, गझलविषयक अनेक मतप्रवाहांचा मागोवा घेत, माहिती मिळवत हा प्रवास अजूनही सुरूच आहे... हे करत असतांना गझलेकडे बघण्याचा आपला स्वत:चा असा एक दृष्टिकोन; स्वतःची अभिरुची, कळत नकळत बनत जाते! ही आपली गझलेविषयीची समज एकांगी आहे की नेमकी, हे मीच कसे सांगू! पण हा प्रवास कधीच न संपणारा आहे! व आपण अजून गझलेच्या किनाऱ्यावरच घुटमळतोय... तिची खोली व अथांग गहनता कळण्यासाठी हा जन्म तोकडा आहे असे मला वाटतेय!

या प्रवासात काही फायदे झालेत; काही तोटे झालेत, पण गझल लिहू लागल्याने माझं इतर काव्यप्रकारावर प्रेम कधीच कमी झालं नाही. फायदा असा झाला की शब्दांच्या संक्षिप्त वापराकडे मी गांभीर्याने पाहू लागलो. नेमक्या शब्दांची योजना काय असते ते वृत्तात लिहू लागल्यानंतरच खऱ्या अर्थाने लक्षात आले.

दुसरीकडे माझा मुक्तछंद थोडा हातातून निसटला. असे बरेचदा होते...  पण त्यासोबतच गझलेसाठी कराव्या लागणाऱ्या वृत्ताभ्यासामुळे मला माझ्या अनेक कवितांना वृत्ताचे कोंदण देता आले हे ही तितकेच महत्वाचे...

गझलेत पुरेशा सरावानंतर आपल्या शब्दयोजनेला एक घोटीव सफाईदारपणा येतो! गझल हा आकृतीबंध आता कुठलीही अभिव्यक्ती वर्ज्य मानत नाही, मात्र आपल्यात काय मांडण्याची क्षमता आहे हे ज्याचे त्याने तपासावे व त्याचा अर्क गझलेत ओतावा!

गझलेबाबत अधिकारवाणीने भाष्य करण्याएवढा मोठा मी नक्कीच नाही, मात्र काही निरीक्षणं नोंदवतो, बघा पटतंय का! यात कोणा व्यक्तीविशिष्टाकडे अंगुलीनिर्देश करण्याचा हेतू नाही, किंबहुना हा मुद्दा वादाचा करण्याचे काही कारण नाही!

अनेक प्रतिभावंतांच्या कविता खरंच खूप जातिवंत, अस्सल व दर्जेदार असतात! पण अशा सन्माननीय लोकांनीसुद्धा  गझल  फॉर्ममध्ये अतिशय असमाधानकारक व सुमार लिहिलेलं आपल्याला बघायला मिळतं! एकतर या रचना जास्तच तंत्रशरण जाणवतात किंवा आपल्या पारंपारिक कवितेलाच त्यांनी तिथे गझलेत ढाळल्याचे निदर्शनास येते! गझलेत काहीतरी वेगळं अपेक्षित आहे हे गमक अभिव्यक्तीच्या अंगाने अजूनही त्यांना नेमकं जमून आलेलं नाही असं जाणवत राहतं! अर्थात हा त्यांचा दोष वगैरे मी मानत नाही, तर फक्त एक निरिक्षण मांडतोय...

त्याचा परिणाम काय होतो की त्या मान्यवरांच्या रचनांकडे बघत, त्यांचा आदर्श घेत किंवा त्यांचा दाखला देत अनेक नव्याने गझल शिकणारे कविमित्र त्याच तऱ्हेने लिहू पाहतात, अभिव्यक्त होत राहतात! त्याचा परिणाम म्हणून गझलेच्या दर्जाबाबत एक चुकीचा पायंडा निर्माण होतो, लोक आपल्या त्या तंत्रशरण व काफियांची नुसती बोळवण केलेल्या रचनांना गझल समजू लागतात! बरं त्यांचा हा गैरसमज कधीतरी जाईल अशी अपेक्षा करणेही अवघड असते! कित्येक लोक आपल्या या गोड गैरसमजातून कधीच बाहेर पडत नाहीत!

गझल लिहितांना एकदा तरी प्रचंड घुसमटीच्या अवस्थेतून जावे लागते, त्यामुळे अशावेळी एखाद्याला काही सल्ला देणेही अवघड असते! त्यासाठी नेमकं कोणतं कौशल्य आणि कसं वापरावं? हे महाकठीणै! या काळात कुणाचा प्रामाणिक सल्लाही नकारात्मक किंवा जाचक वाटू शकतो! अनेकांचे इगो दुखावतात! त्यामुळे मग जे नको व्हायला तेच परत परत होत राहते!

तंत्राच्या सांगाड्यात शब्द बसवायचे म्हटले की अनेक प्रतिभेचा लवलेश नसलेले घटकही हा 'टाईमपास' करून बघतात! ज्यातून मराठी गजलेचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नुकसानच होतेय...

आणि गझल नेमकी समजून येईपर्यंत गझल शिकण्याच्या वेगवेगळ्या अवस्थांतरामध्ये तयार झालेल्या बिनकामाच्या, निराधार अशा तांत्रिक रचनांचे आपण काय करतो? कित्येकांनी घाईघाईत त्याचीही पुस्तकं छापून टाकली आहेत! पुस्तकं छापली म्हणजे आपल्याला साहित्याची फार मोठी सेवा केल्यासारखे वाटते!

आपल्यापैकी प्रत्येकजण या सर्व अवस्थांतून गेलेला आहे... उत्तरोत्तर हा प्रवास उर्ध्वगामी होणे अपेक्षित असते! पण तो तसा प्रत्येकाचा होतोच असे खात्रीने सांगता येते का? यावरही आत्मचिंतनाची गरज आहे...

आता प्रश्न असाही येतो की यात मला त्रास व्हायचे कारण काय? भई मै क्यों परेशान हूँ? मित्रहो यात मला दु:खी कष्टी व्हायचे काही कारण नाही! पण आपल्याकडे एक म्हण आहे की म्हातारी मेल्याचं दु:ख नसतं पण काळ सोकावतो... ते दु:ख वाईट असतं! या न्यायाने कोणा एकाचा दोष नसताना एक चुकीची शैली, एक चुकीचे गझल परिमाण निर्माण होण्यास आपण कारणीभूत ठरतो मित्रहो! एका समृद्ध काव्यप्रकाराला यामुळे आपण रसातळाला घेऊन जातो...

जे सुमार आहे तेच उत्तम मानलं गेलं तर 'जे जे उत्तम उदात्त' ह्या परिमाणांच काय? ते सगळे मापदंडच बदलून टाकायचेत का! अर्थात कवितेची प्रत कोण आणि कशी ठरवणार म्हणा! हे असे अनेक प्रश्न आहेत... बऱ्याच समस्या आहेत...

"उगाच वृत्त-छंद लागलेत आवडायला
गझल लिहायचे मला व्यसन नको जडायला"

काहींना गझलेचे वाईट व्यसन लागलं आहे तिथे गझलेच्या तंत्रामध्ये काहीही (म्हणजे जे मनात येईल ते) लिहीत आहेत! इथे पुन्हा मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण जेव्हा त्यावर चर्चा करण्याची वेळ येईल तेव्हा त्याला प्रयोग म्हणजे 'एक्सपिरिमेंट' चे नाव दिले जाऊ शकते! म्हणजे मग त्याला विरोध करण्याचे कारण उरत नाही!

पण या सर्वांच्या पलिकडे एक जो 'शब्दब्रह्म' असतो ना, तो अतिशय प्रामाणिक आरस्याचे काम करत असतो.. तो आपल्या प्रगतीचा, प्रतिभेचा चढता-उतरता आलेख इमानदारीने मांडत असतो! प्रयोगाबाबतचे आपले गांभीर्य, नियमितता आणि नीतीमत्ता वेळोवेळी अधोरेखित करत असतो...

आपल्या ओळीओळीतून हे सगळं सगळं पाझरत असतं... प्रयोग करायला हरकत कुणाचीच असू शकत नाही! पण आपण करत असलेले प्रयोग समजून उमजून व्हायला हवेत! म्हणून नव्या लिहित्या हातांनी गझल जास्तीतजास्त नेमकेपणाने समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे!

"मी काफियांसाठी लिहित नाही गझल आता
बस एवढी कळली मला माझी मजल आता"

'सौभद्र'
(संजय गोरडे, नाशिक)
7276091011


No comments:

Post a Comment