शिवम् पिंपळे : तीन गझला


१.
लॉटरी ती पुन्हा लागली पाहिजे
भेट माझी तिची जाहली पाहिजे

सर्व बांधून दुःखे बसू प्यायला
बस..न संपेल ती बाटली पाहिजे

आज धमकावले मी भुकेला असे
"चार घासांत तू भागली पाहिजे"

नातवाचा अज्याला असा हट्ट की
आज बाराखडी वाचली पाहिजे

फार खुषहाल आहे म्हणे ती जिथे
एक चक्कर तिथे टाकली पाहिजे

श्वास श्वासामधे या असे तोवरी
एकदा पंढरी गाठली पाहिजे

२. 
सारखी काळजी वाटण्यासारखे
कोवळे वय तुझे पाखरासारखे

जन्म व्याजावरी घेतल्यासारखा
दुःख हफ्त्यांमधे फेडल्यासारखे

आज काहीच लक्षात नाही तिच्या
फार होते कुठे ठेवण्यासारखे?

एकदा भेट तपशील ऐकायला
खूप आहे जवळ सांगण्यासारखे

काय अस्तित्व आहे तुझे माणसा?
जीर्ण भिंतीवरी पोपड्यासारखे..

एवढे दे मला फार काही नको
जन्मभर लोक सांभाळण्यासारखे

३. 
आजवर नाही मलाही भेटलो
मी स्वतःपासून आहे वाचलो

लोक मजला दूर सारू लागले
मग मला मी आवडाया लागलो

मंदिरे बांधून दगडांची, किती
होवुनी मी देव त्यांना पावलो

"तू मनापासून आवडते मला"
मी कधी नाही तिला हे बोललो

स्वार्थ माझा साधण्याला आजवर
पाहिजे तेव्हा बरोबर वाकलो

ती मला घेऊन आहे चालली
माहिती नाही कुठे मी चाललो
.............................................
शिवम् पिंपळे, औरंगाबाद

No comments:

Post a Comment