अभिषेक उदावंत : पाच गझला


१.
कावळा चिमणी कधी मी मोर होतो
मी मुलीच्या पाळण्याचा दोर होतो

झोपली मुलगी तसे घर शांत होते
त्याच वेळी बायको मी चोर होतो

मी मुलीचा बाप आहे ह्या भितीने
एक ढग मग आत काळाभोर होतो

आसवांना फक्त माझ्या दूर ठेवा
पाहिले डोळ्यात की कमजोर होतो

काँम्प्युटरशी खेळते हे बाळ माझे
चंद्र आकाशात नुस्ता बोर होतो

त्या निळ्या  साडीतले संदर्भ इतके 
पाहिले आभाळ  की, मग घोर होतो


२.
संयमाची वाढ करतो
मी उन्हाचे झाड करतो

मंदिरावर जात नाही
तर  मुलांचे लाड करतो

बोलतांना मान देतो
तो जिभेला हाड करतो

पाहतो रस्ता घराला
दार खिडक्या आड करतो

मी मुलांशी बोलतांना
जीभ थोडी जाड करतो

3.
दळता दळता पीठ झालो
त्याच्या नंतर धीट झालो

आधी होतो वाकडा मी
आता आता नीट झालो

सुकलेल्यावर  गझल लिहिली
ओल्यापेक्षा हीट झालो

त्या नजरेची नजर काढा
लिंबू ,मिर्ची ,दीट झालो

तू थोडीशी सैल होती
मी थोडासा फीट झालो

विठ्ठल केल्या चार भिंती
संसाराची वीट झालो

तितक्यापुरती गोड बर्फी
चटणी ,भाकर , मीठ झालो

४.
आधी दोन्ही चप्पल घालू
नंतर पाया सोबत चालू

लग्नाची ही एक आठवण
फोटो अल्बम , दुसरा शालू

संकट म्हणजे काय नेमके
जितके भ्यालो तितके हालू

फक्त प्रेयसी साधी असते
बाकी सगळ्या पोरी चालू

अशी बायको नॉर्मल नसते
सांगा कुठली साडी घालू
      
 ५.
लोक विश्वासातले गद्दार झाले
मोठमोठे शूर योद्धे ठार झाले

खूप रडला बाळ श्रावण ऐकल्यावर
का ? मुलाला बाप आई भार झाले

काढली मी फक्त तंबाखू पुडी अन
लोक आपोआप माझे यार झाले

वाटणी झाली जशी माझ्या घराची
मोकळ्या जागेत नंतर दार झाले

एक आशेचा दिवा दिसला अचानक
फार मोठे एक अंतर पार झाले

एक माणुस हाय खावुन काल मेला
कोणता सांगा पुरावा वार झाले

खेळली  ती रंग विधवा बांधलेली
पांढरे आयुष्य मग श्रृंगार झाले
.............................................
अभिषेक उदावंत
अकोला

3 comments:

  1. आधी होतो वाकडा मी
    आता आता नीट झालो...
    बहोत बढीया अभिषेकजी....

    ReplyDelete
  2. अप्रतिम दादा....

    ReplyDelete
  3. छान गझला अभिषेकजी. हे शेर विशेष आवडले.

    काँम्प्युटरशी खेळते हे बाळ माझे
    चंद्र आकाशात नुस्ता बोर होतो

    आधी होतो वाकडा मी
    आता आता नीट झालो

    फक्त प्रेयसी साधी असते
    बाकी सगळ्या पोरी चालू

    अशी बायको नॉर्मल नसते
    सांगा कुठली साडी घालू

    एक आशेचा दिवा दिसला अचानक
    फार मोठे एक अंतर पार झाले

    ReplyDelete