शुभानन चिंचकर : पाच गझला


१.
नाटक झाले, पडदा पडला नंतर
खरा चेहरा उघडा पडला नंतर

खरा चेहरा उघडा पडला नंतर
नजरेतून स्वतःच्या पडला नंतर

शहरामधला मुलगा येउन गेला
गावाकडचा वाडा पडला नंतर

त्याची सगळी माया आटुन गेली
पार कोरडा ओढा पडला नंतर

शेंड्याला वाटले नभावर गेलो
बुंध्याशी पाचोळा पडला नंतर

किंमत कळली मूर्तीलाही तेव्हा
तुटून जेव्हा टवका पडला नंतर

पडद्यामागे नवेच नाटक घडले
गुपचुप त्यावर पडदा पडला नंतर

पदर पाडुनी भाव अगोदर खाल्ला
भाव जुन्या पदराचा पडला नंतर

कुठलाही सिक्वेन्सच लागत नव्हता
त्याचा पत्ता उघडा पडला नंतर

इच्छा सगळ्या मरून गेल्या होत्या
कोणासाठी तारा पडला नंतर

झोप लागलेली मरणाची आधी
ह्या जन्माचा दुचका पडला नंतर

२.
फोन वाजला अवेळीच तर दचकुन उठते
भयशंकेने शहारून घर दचकुन उठते

काय गरज दगडाची होती ढवळण्यास तळ
पान गळाले तरी सरोवर दचकुन उठते

स्पर्श सरपटत शोधत येतो काळोखातुन
आणि अपूरी गाफिल चादर दचकुन उठते

हळद कोवळी, नाजुक कंबर, डोह खोलगट
पुन्हा श्वास घुसमटून घागर दचकुन उठते

लाल सूर्य माथ्याचा येते रात्र पुसाया
सांज रंडकी होउन कातर दचकुन उठते

आभाळच फाटले भरारी कशी घ्यायची
घरट्यामध्ये सुन्न कबूतर दचकुन उठते

धडपडून म्हातारा उठतो... पेला पडतो
मोत्या भुंकत येतो, मांजर दचकुन उठते

वांझोटी येतात सांत्वने टाहो फोडत
सफेद वस्त्रामधले वावर दचकुन उठते

स्वप्न भयानक पडते का माणुस झाल्याचे
आजकाल झोपेतुन वानर दचकुन उठते...

३.
सांगते चिमणी, नभाला भ्यायचे नाही
का पिलू घरटे तरी सोडायचे नाही...?

हे नको बोलू... असे वागायचे नाही
का तिला स्वातंत्र्य हे ठरवायचे नाही

खूपदा झोपेमधे दचकून उठते ती
बोलते काकांसवे खेळायचे नाही...

ओल सारी घेतली शोषून जगण्याने
का तिने मग कोरडे वागायचे नाही

शेवटी नात्यातले अवशेष सापडतिल
खोलवर इतके कधी खोदायचे नाही

तू खरोखर सांग ना, नाहीच का समजत
की तुला काहीच समजुन घ्यायचे नाही

प्यायची आहे जगाची तीव्र दाहकता
मृगजळाने फारसे भागायचे नाही

धाक बसवित रोज येई ऊन माध्यान्ही
मग कुणी चिटपाखरूही यायचे नाही

शेंदुराची चढवतो आहे पुटे जो तो
आतवर कोणासही पोचायचे नाही

येत नाही बुद्धिबळ, पण एवढे कळते
मोहरा आता कुणाचा व्हायचे नाही

४.
खिडकी, खुर्ची, पुस्तक हाच सहारा उरला आहे
बघण्यापुरता आभाळाचा तुकडा उरला आहे

मला भेटले मृगजळ त्याची नदी न करता आली
माझ्यातिल गुरुदत्त आजही प्यासा उरला आहे

माझ्या असण्याचे सारे केव्हाच वितळले चेहरे
पण माझ्या नसण्याचा शाश्वत साचा उरला आहे

बांधू बघते इमारतीमध्ये शहराची जादू
मनामधे पण अजून पडका वाडा उरला आहे

अशा अवस्थेपर्यंत अपुला प्रवास झाला आहे
उडून गेले अत्तर, नुसता फाया उरला आहे

मला लागले आहे आता या शहराचे पाणी
कुठे तसाही गावाकडचा ओढा उरला आहे

५..
धुणी धूतात दोन्ही बाजुने ... दुर्लक्ष कर
नदी आहेस, वाहत जा पुढे ... दुर्लक्ष कर

उभे करतोस का बुजगावणे ... दुर्लक्ष कर
किती खाऊन खातिल पाखरे ... दुर्लक्ष कर

तुझे रेशीमही गणतील ते कॉटनमधे
किती करतील करणारे किडे ... दुर्लक्ष कर

तुला बघतील असुयेने, घडे ज्यांचे रिते
तुला मारूनही जातिल खडे ... दुर्लक्ष कर

रडुन उपयोग नसतो... ऊठ, आपले कर्म कर
तसेही रोजचे आहे मढे ... दुर्लक्ष कर

कशाला यायचे घेऊन अंजन एवढे
इथे दिसतात सारे आंधळे ... दुर्लक्ष कर

नवा इतिहास जर घडवायचा आहे सशा
तुला दिसतील भरपुर गाजरे ... दुर्लक्ष कर

अरुण... जग ठेवते मुद्दाम अंधारामधे
पुढे फुटतेच नक्की तांबडे ... दुर्लक्ष कर

तुझे माहीत आहे... वाचणे गुपचुप मला
मला माहीत आहे... जाउदे ... दुर्लक्ष कर

............................................

1 comment:

  1. सर्वच गझला छान झाल्या आहेत शुभानन. हे काही शेर तर खूप खास...

    नाटक झाले, पडदा पडला नंतर
    खरा चेहरा उघडा पडला नंतर

    पडद्यामागे नवेच नाटक घडले
    गुपचुप त्यावर पडदा पडला नंतर

    धडपडून म्हातारा उठतो... पेला पडतो
    मोत्या भुंकत येतो, मांजर दचकुन उठते

    तू खरोखर सांग ना, नाहीच का समजत
    की तुला काहीच समजुन घ्यायचे नाही

    खिडकी, खुर्ची, पुस्तक हाच सहारा उरला आहे
    बघण्यापुरता आभाळाचा तुकडा उरला आहे

    मला लागले आहे आता या शहराचे पाणी
    कुठे तसाही गावाकडचा ओढा उरला आहे

    उभे करतोस का बुजगावणे ... दुर्लक्ष कर
    किती खाऊन खातिल पाखरे ... दुर्लक्ष कर


    ReplyDelete