वैवकु : पाच गझला

१.
एक पोरगी खूप खूप साधी होती
दुनियेला नंदनवन म्हणणारी होती

काल तुला जो चुना लावला गेला ना
चुना नव्हे , चंद्रावरची माती होती!

तिला पाहिले..क्षणात झालो निरभ्र मी
एक ओढणी फिक्कट आकाशी होती

मी त्या प्रत्येकाची माफी मागितली
ज्या कोणावर माझी नाराजी होती

फलाट गेला निघून त्याच्या गावाला
तिथे उभी होती ती तर गाडी होती

तुला एक विठ्ठल दाखवलेला बघ मी
ती माझ्या आनंदांची चावी होती

२.
स्नेह माझातुझा सांगण्यापावता राहिला शेवटी
हुंदका पूर होऊन डोळ्यांंमधे दाटला शेवटी

साधता येत नव्हती तुझ्यासारखी शुद्ध निर्लेपता
फक्त रंगच तुझ्यासारखा मी मला फासला शेवटी

मी जरा आरसा पाहिला अन जरा चेहरा पाहिला
आरशाचाच पण मी तडा अन तडा सांधला शेवटी

जन्म सारा, उगाळू-उगाळून परिणाम झाला असा
चंदनासारखा गंध आलाच आला तिला शेवटी

खूप उपकार केलेत नाॅस्टॅल्जियाने तसे आजवर
आजचाही दिवस त्याच आगीत मी जाळला शेवटी

थांबलो पण मला थांबल्यासारखा फील येईचना
एक झोका तुझ्या नावचा मी मनाला दिला शेवटी

३.
वास्तवापासून आलो दूर मी
गाठले भलतेच पंढरपूर मी

पाहतो आहे मला हा आरसा
दाखवत आहे मला निष्ठूर मी

मी अता सिगरेट नाही प्यायलो
प्यायलो हा जाणिवांचा धूर मी

आजची रिपरीप नाही झेपली
आठवत होतो तुझी भुरभूर मी

भेटली , गांभीर्य लपवत राहिली
मी लपवले की किती आतूर मी

ऐकणारा कान नाही शोधला
शोधला नुसता स्वतःचा सूर मी

देव तू ! उरल्या युगांची वाट बघ !
चाललो होऊन क्षणभंगूर मी

४.
एकेजागी मन बसले की पुढे जात नाहीच मुळी
जणूकाय ते आयुष्याच्या प्रवासात नाहीच मुळी

म्हणे तुझ्या इच्छेविण साधे एक पान हलणे नाही
(..तरी जगाच्या पतनामध्ये तुझा हात नाहीच मुळी !)

एक मतांचा प्रवाह आहे तुझा , एक माझा आहे
नदीत ह्या पण कुणी कुणाच्या विरोधात नाहीच मुळी

एक दिखाऊ चर्वितचर्वण करत राहतो तो नुसते
काळ कधी माझ्या दुःखांचे चणे खात नाहीच मुळी

जरी पाळलेला आहे पण सिंहच तो , खाणार तुला !
तळवे चाटत बसणे त्याच्या स्वभावात नाहीच मुळी

मी तर आपखुशीने माझे उदास गाणे वाजवले
तिला वाटले माझे काही सुशेगात* नाहीच मुळी

साठ वॅटच्या बल्बामधल्या 'उन्हेरात' जी मजाय ना
तशी मजा ह्या एल् ई डीच्या उजेडात नाहीच मुळी

तुझ्या आतल्या तुझ्याशीच तर तू बोलत आहेस खुळ्या
विठ्ठल नावाचा कोणीही तुझ्या आत नाहीच मुळी

५.
एक मिसरा दिपून आलेला
जन्म अंधारवून आलेला!

गंध उधळायचे तिला होते
आज वारा थकून आलेला

भरकटत राहिला चुकत गेला
एक रस्ता वळून आलेला

नाव सोडायला नको होती
डोह नव्हता भरून आलेला

मी उन्हाळा जवळ करत होतो
आणि लाडात जून आलेला

आज तुटलोच हे बरे झाले
छान धागा जुळून आलेला

एक विठ्ठल असा हवा होता
"आज येतो" म्हणून..आलेला!
.............................................
- वैभव वसंत कुलकर्णी

1 comment: