विनोद बुरबुरे : दोन गझला



१.
अशी वेदना ही सराईत झाली
जणू जिंदगानी ति-हईत झाली

कुण्या काळजाआतला बांध फुटला
नदी पापण्यातुन प्रवाहीत झाली

घुसवले सिमेआत नापाक शत्रू
अटल भेट जेव्हा कराचीत झाली

अशी वर्तुळे आतड्यांची जहाली
जणू भाकरीने प्रभावीत झाली

मुळांना जसा घाम माझा मिळाला
फुले अत्तराने सुगंधीत झाली

कधीचेच सोने धुराने उडाले
तिची निर्मिती मग कहाणीत झाली

२.
चेतवाया प्राण हा तू जिवाची वात दे
हा दुरावा जाळण्या फक्त हाती हात दे

पेरतो मातीत या स्वप्न माझे कोवळे
तू रुजाया अंतरी मोसमी बरसात दे

राजवाडा ना तुझा ना हवे सोने हिरे
फक्त जागा आपल्या काळजाच्या आत दे

चंद्रगोलाई सखे काय कामी सांग ना ?
द्यायचे पोटास तर भाकरीची बात दे

त्रासलो मी सारखा जिंकण्याने माझिया
एकदा येऊन जा अन् मला तू मात दे

धर्मही सांगू नको तू नव्याने कोणता ?
माणसांना फक्त या माणसाची जात दे
.........................................................................
■ विनोद बुरबुरे
सुरजनगर, वेडुर्य अपार्टमेन्ट , यवतमाळ
मो. 9096708377

No comments:

Post a Comment