मनीषा नाईक : पाच गझला




















१.
अचानक हाक जेव्हा आतली मी ऐकली
मला बाहेरची दुनिया बनावट वाटली

चला शोधू नवे रस्ते पुन्हा आपापले
इथे रेंगाळण्याची कारणेही संपली

घराच्या आतली मी रीत आधी मोडली
मुलीला आणलेली ओढ़णी मी फाडली

नको ढवळायला माझ्या मनाची शांतता
तुझी मैफिल खरेतर याचसाठी टाळली

तुझ्या माझ्यात अंतर फार वाढू लागले
अताशा होत नाही भेट सुद्धा आपली

मला प्रेमात पडल्यासारखी ती वाटली
उभी शेजारची मुलगी अचानक लाजली

सुखादुःखात पण शेजार होता सोबती
किती श्रीमंत होती माणसे गावातली

कुठे होतो तसा संवाद आता आपला
कुठे होतात हल्ली भांडणेही आपली 

उगाचच होत गेली बातमी त्याची पुढे
तशीतर गोष्ट होती आपल्या दोघातली

प्रवाही होत गेली मग 'मनी' आयुष्यभर
तिने आधी स्वतःची वाट होती शोधली

२.
एकाच किनार्यावर दोघे
बहुदा झालो सागर दोघे 

बरेच काही मनात आहे
पण, बोलू सुचल्यावर दोघे 

वाद नको कुठल्या मुद्यावर
दोघे चूक,  बरोबर दोघे 

वेगवेगळे प्रश्न जगाला
त्यावर सोपे उत्तर दोघे 

थोडे थोडे सरकत राहू
खोडू मधले अंतर दोघे 

एकमेकात मिसळत गेलो
दोघे पाणी, साखर दोघे 

जरी वेगळ्या डब्यात चढलो
स्टेशन सांगू दादर दोघे 

ऊन पाऊस सोसत गेलो
म्हणून झालो कणखर दोघे 

मिठीत आलो मग दरवळलो
बहुदा झालो अत्तर दोघे

३.
खुले आकाश, धरती, शेत, घर, झाडे नदी डोंगर
किती श्रीमंत वाटू लागते गावात आल्यावर

स्वत:चे दु:ख विसरूनी जगाचा आसरा झाले   
मला त्या सर्व लोकांचा खरोखर वाटतो आदर

कुणी निघते पुढे जाते स्वत:चा शोधते रस्ता 
कुणी थांबून जागेवर जगावर फोडते खापर 

विसरले मागचे सारे जरी मी लग्न झाल्यावर
तरी का वाढते धडधड तुझ्या गावात आल्यावर

टिपूनी आसवे त्याची म्हणाली पोर बापाला
तुझा आधार होते मी मला आणून दे दप्तर

जुने संदर्भ असलेली वही मी फाडली आहे
अजूनी पाठ आहे पण तुझ्या बाईकचा नंबर

कधीपासून फिरते गोल ही सारखी पृथ्वी
कुणी थांबायला सांगा तिला येईल ना चक्कर

मराठी आपली शाळा जिथे होती कधीकाळी
तिथे एका पुढाऱ्याने विदेशी बांधला टॉवर

बघूया स्वप्न ग्लोबल भारताचे पण जरा नंतर
हवी आधी बळीराजास इथल्या पोटभर भाकर

४.
असू दे वेदना येतील थोड्याफार वाट्याला
तरीही जन्मभर यावा तुझा शेजार वाट्याला

कितीदा जन्म घेते मी तुझ्या मागे किती फिरते
अजूनी येत नाही पण तुझा होकार वाटयाला

मनाला शांतता नाही जिवाला घोर लागावा
तुझ्या प्रेमात आले केवढे आजार वाट्याला

मला आनंद होळीचा तुला भेटून होतो पण 
कुठे येतात माझ्या सारखे सणवार वाट्याला  

जरी मी सूर्य नाही काजवा आहे तुझ्यासाठी
तरी येवू दिला नाही तुझ्या अंधार वाट्याला

कुठे ना फारशी रमले कुठे मी गुंतले नाही
नको तो प्रेम नावाचा कधी व्यवहार वाट्याला

फिरस्ती थांबली नाही इथे तर जन्मभर माझी
फिरस्ताच्या कुठे येते कधी घरदार वाटयाला

नको वेणी, नको गजरा,नको कुंकू,नको टिकली
तसा असतोच प्रेताच्या कुठे शृंगार वाट्याला

तुझे मी घाव सारे सोसले आहेत आयुष्या   
कदाचित त्यामुळे आला नवा आकार वाट्याला

५.
पुन्हा एक उचकी, पुन्हा एक ठसका, गुलाबी शहारा मनाला पुन्हा
पुन्हा एकदा थांबला श्वास माझा कुणाचा तरी भास झाला पुन्हा

पुन्हा शक्य होते तुला भेटणे पण गडे टाळला आज रस्ता तुझा 
नको गुंतणे अन नको मोह माया नको यातना या जिवाला पुन्हा 

पुन्हा जन्म घेते नव्याने इथे मी पुन्हा शोध माझा नव्याने सुरू
पुन्हा वाहते मी नदीच्या प्रमाणे मला भेटवा सागराला पुन्हा

पुढे चालते मी पुन्हा पाय मागे अशी देह वारी निघाली कुठे
पुन्हा घुटमळू लागला जीव मागे लळा लावला मी कुणाला पुन्हा

पुन्हा एकदा हाक आतून आली पुन्हा एकदा शोध झाला सुरू 
जशी भेट झाली स्वत:ची स्वत:शी तसे सोडले मी जगाला पुन्हा

नको थांबणे, बोलणे, भेटणेही नको हाक मारूस आता मला
गडे चालले मी नभाच्या दिशेने नको पिंजरा पाखराला पुन्हा

किती वाट पाहू किती जन्म थांबू किती मी प्रतीक्षा करावी तुझी

मला भेट तू याच जन्मी सख्या रे पुनर्जन्म मागू कशाला  पुन्हा
...........................................
मनीषा नाईक

No comments:

Post a Comment