विद्यानंद हाडके : चार गझला


१.
माझ्या सभोवताली सारे शवाप्रमाणे
मी साद देत आहे येथे खुळ्याप्रमाणे

निस्वार्थ भावनेने सर्वस्व देत जावे
आयुष्य हे जगावे ताज्या फुलाप्रमाणे

माझा जरी अताशा सत्कार होत आहे
आयुष्य भोगले मी येथे गुन्ह्याप्रमाणे

आवाज ऐकला मी आता इथे कुणाचा
साऱ्या तशाच भिंती सारे जुन्याप्रमाणे

वाचू नको समजला आता पुन्हा नव्याने
एकेक शब्द माझा झाला सुऱ्याप्रमाणे

गेले घडून त्याच्या आता नकोत चर्चा
होते कधी कुणाच्या येथे मनाप्रमाणे

२.
जेथे समर्पणाचा निर्धार होत नाही
संसार मांडल्याने संसार होत नाही

डोळ्यांमधून अलगद हृदयास स्पर्श होता
प्रेमाशिवाय दुसरा आजार होत नाही

आयुष्य आपले हे दगडा समान आहे
केल्याशिवाय त्यावर संस्कार होत नाही

पाऊल घेतले मी मागे अता जरासे
याचाच अर्थ काही माघार होत नाही

 माथा कशास ठेवू दगडासमोर माझा
ज्याचा कधी कुणाला आधार होत नाही

मी हारलो असाही मी हारलो तसाही
माझे प्रयत्न म्हणुनी बेकार होत नाही

३.
आयुष्याच्या वाटेवरती वळता वळता वळले सारे
कोण आपले कोण पराये कळता कळता कळले सारे

बांध बांधले फुटून गेले; शिस्त शेवटी तुटून गेली
किती थोपवू आसवास मी गळता गळता गळले सारे

परदास्याच्या बेड्या तुटल्या एक तुझ्या बस विश्वासाने
युगायुगाचे जळमट तेव्हा जळता जळता जळले सारे

राष्ट्रध्वजाला जेव्हा-जेव्हा भ्रष्टाचारी हात लागले
मानवतेचे विश्व रंगही मळता मळता मळले सारे

सौंदर्याचा हुकुमी एक्का ज्याला त्याला भारी पडतो
विश्वामित्रा तूच काय रे चळता  चळता चळले सारे

४.
सांगा किती करावा जोहार माणसांनी
झटकून राख व्हावे अंगार माणसांनी

गद्दार माणसांनी छातीत वार केले
बस एवढेच केले उपकार माणसांनी

सारी गळून पडली शस्त्रे युगायुगांची
करताच लेखणीला तलवार माणसांनी

युद्धा शिवाय केले जगणे पसंत तेव्हा
केलेत माणसांचे सत्कार माणसांनी

खणकावुनी अता जर खुर्दाच बोलतो तर
झोपेतूनी उठावे कलदार माणसांनी

आदर्श जीवनाचे सारेच व्यर्थ ठरले
स्वीकारता ठगांचे सरकार माणसांनी

ही वेळ योग्य आहे मैदान मारण्याची
आत्ता खरा करावा एल्गार माणसांनी
........................................................
विद्यानंद विश्वेश्वर हाडके
'दयाविश्व', सानेवाडी,
वर्धा.
९०२१५५९०७९८

No comments:

Post a Comment