विश्वास कुलकर्णी : पाच गझला


१.
जायचे आहेच जर गावाकडे
न्यायचे नाही शहर गावाकडे

पावसाला यायचे असलेच तर
वेचण्या यावे बहर गावाकडे

बांध बांधाला नसावा फक्त वा
केवढा होतो कहर गावाकडे !

काकडा ते चांदण्याच्या चादरी
देखणे अष्टौप्रहर गावाकडे

भौतिकाची कौतुके नसतात रे
जिंदगी असते सुकर गावाकडे

जाहली शहरात नात्यांची व्यथा
लागतो पदरा पदर गावाकडे

बांधला नाहीच वृद्धाश्रम कुणी
आजही शाबूत "घर" गावाकडे .. !!

२.
थेट आभाळ क्षितिजास चुंबायचे
अन दिशांचे नव्याने धुके व्हायचे

परसदारी फुले ल्यायची पैंजणे
चांदणे अंगणाच्या घरी यायचे

गोड गाली किती त्या गुलाबी छटा
संयमाने किती.. काय सोसायचे ?

धाक नजरेमधे गोड इतका तिच्या
शब्द शिकले मुक्यानेच बोलायचे

पावसाला तिला स्पर्शिण्याची मुभा
कोरड्यानेच अन मी शहारायचे..

आरशाला कशाला हवी रे फुले
त्यास आहे तिला थेट माळायचे

प्रेम म्हणजे अरे फार सोपे गणित
आसवे तू तिने पापणी व्हायचे... !!

३.
तप्त आगीच्या उराशीही उमाळा पाहिजे
अंतरंगी ओल ज्याच्या तो उन्हाळा पाहिजे

भेट दे मूर्तीतला तू देवही बिनधास्त पण
काळजी घे फक्त त्याचा रंग काळा पाहिजे

दोन थेंबांनी कुठे का बीज येते अंकुरा
वावराच्या गूढ गर्भी "तो" जिव्हाळा पाहिजे

खूप झाले पावसाचे सांगणे अंदाज ते
सुख कधी ? हे सांगणारी वेधशाळा पाहिजे

लेक शाळेला निघाली की मला वाटायचे
बापलेकीची अशी एकत्र शाळा पाहिजे

दु:ख आले की सुखाने जायचे नक्की कुठे
काळजाला एक छोटा पोटमाळा पाहिजे

आपले नाणे बरोबर वाजते गर्दीतही
छेडतो जो सूर आपण तो निराळा पाहिजे..!

४.
देणगीची पावती सन्मान नसते
शेवटी ती देणगी.. ते दान नसते

एवढे सांगा जरा कोणी मुलाला
बाळ, बापाची शिवी अपमान नसते

लेक सांभाळा तसे आईससुद्धा
श्वापदांची वासना सज्ञान नसते

पावसाळा येत आहे काळजी घ्या
घसरण्याला वय वगैरे भान  नसते

किर्र काळोखासही असतोच मृत्यू
येथल्या अवसेसही वरदान नसते

का खरे बोलेल सांगा वेधशाळा
सातबा-यावर तिच्या जर रान नसते ..?

५.
 पथ्य ठरवून पाळले आहे
आरशालाच टाळले आहे

बीज रडणार ते कुणापाशी
पावसानेच जाळले आहे

हा न दुष्काळ वा कुपोषणही
पोट पाठीस भाळले आहे

पान आहे जरी वहीमध्ये
पार आतून वाळले आहे

लोकशाहीच नांदते येथे
फक्त लोकास गाळले आहे

पाखरांनीच मांडला दंगा
गोफणींनी पिसाळले आहे

जीव लेकीवरीच का ? ... म्हणजे ?
तिजमुळे घर झळाळले आहे 
.............................................
विश्वास कुलकर्णी, कोल्हापूर

No comments:

Post a Comment