राहूल गडेकर : पाच गझला


१.
स्वस्थ बसू देईना इच्छा
ह्या तर नव्हत्या माझ्या वाटा

दोनच बोळी फिरलो जादा
फुकट खालची शिकलो भाषा

तोच शिळा तो दिवस रोजचा
सूर्य शिंपडू.. करूत ताजा

नव्हतीच एक जागा त्याची    
तिचा लागला कुणास पत्ता

ज्याला कधीच प्रेम न कळले
तिच्या शब्दात माझी व्याख्या

जिथे पटावी ओळख माझी
आणखी कुठे अंधार असा

मिळो ना मिळो काही येथे
जन्म मिळाला बस आहे ना

२.
उंच स्थळांनी फार प्रभावित आहे
सध्या ते पाऊल नवोदित आहे

रडलो नाही म्हणून दुःखी सगळे
रडणे येथे इतके प्रचलित आहे

वाटतो कुणी वेगळाच तो आता
तो तो नाही तर परिवर्तित आहे

संपवेल तो जगणे त्याचे आता
तो जगण्याने त्याच्या प्रेरित आहे

नियतीसुद्धा खुडत पाकळ्या बसते
समोर नाही दरी.. कदाचित आहे

फार कशाला आपल्यात उगवू चल
वाढ आतली पण दुर्लक्षित आहे

मी बागेचा माळी होतो पूर्वी
ती आठवणे किती सुगंधित आहे

३.
हिशेब नाही कितीक सलली, सलली नाही
चुकलेच जरा गोष्ट कुठे पसरवली नाही

काय बघितले इतके हे तर काळच जाणे
तिची पापणी जन्मात उभ्या लवली नाही

वाढ एवढी इच्छेला पण चिंता मिटली
पुढे स्वतःच्या भाराने ती उठली नाही

अंधारातच कसब लागली सर्व पणाला
कुणी शक्यता उजेडात चाचपली नाही

इतक्यात नका घेऊ डोक्यावर मला कुणी
मलाच माझी अजून खोली कळली नाही

सखोल असती तर हा क्षणही औरच असता
ओझरतीच निघाली इच्छा, टिकली नाही

४.
सूर बिघडल्यानंतर मग, पुन्हा सहज लागत नाही
दिवस संपतो कसाबसा, रात्र सहज संपत नाही

मागे येणाऱ्यांची मी, दिशाभूल करतो कारण
गाव एकदा सुटले की, पुन्हा परत भेटत नाही

आभासी जगणे आणिक, व्यवहार शून्यता अपुली
एक ठोकळा लावाया, धड जागा गवसत नाही

एवढ्यात बहुधा त्याचा, तुटला संवाद स्वतःशी 
जगाकडे बघतांना तो, शीर्षासन लावत नाही 

वर्मावर बोट एकदा, अचूक जागी लागावे 
नंतर पाहू कोणाची, लवचिकता ताठत नाही

शक्य तेवढे अपुलेपण, सभोवती साठवून घ्या 
भीती जोवर मरणाची, अपुल्याला गाठत नाही

५.
दूर आहे तुझ्या भल्यासाठी
यात काही तुझी चुकी नाही

सांडले सांडणार होते जे
जेवढी शीग तेवढी माती

जोड झाले जमा नको तितके
तोडही हातचे सुटू पाही

गोष्ट अपुल्याच चारचौघांची
गोष्ट आहे दुरून बघण्याची

प्रश्न उडवून लावतो हाही
काळजीने विचारणा नाही

ताण राहील फार तर थोडा
तोडण्यातील प्रकृती नाही

दूर आहे तुझ्या भल्यासाठी
यात काही तुझी चुकी नाही  
.............................................
राहूल गडेकर

No comments:

Post a Comment