दास पाटील : पाच गझला


१.
जग त्याचे तर विटेभोवती आहे
कुठे पंढरी त्याची झाली आहे

एक भगीरथ गंगा घेउन आला
टँकरभवती झाली गर्दी आहे

पाणवठ्यावर जे गेले त्यांच्याही
डोळ्यांमध्ये मुबलक पाणी आहे

तशी जिंदगी फार चांगली दिसते
तशी जिंदगी वाया गेली आहे

माहीत मला वाट इथे आलेली
इथून कोठे पुढे चालली आहे

गर्दीमधला एक चेहरा माझा
ओळख बस, इतकीच पुरेशी आहे

२.
पहायचे तर ऊन तुझे आतून पहा
मिटून डोळे आत अंधारवून पहा

गोष्टी तर सगळ्याच स्पष्ट असतात तशा ,
भिंग तुझ्या दृष्टीचे सरकावून पहा

तू का म्हणतो, ही दुनिया माझी नाही ..
तूच अगोदर तुझा जरा होऊन पहा

ओढवलेली नाही, तू आणलीस ही !
अता तूच ह्या वेळेशी जुळवून पहा

त्यामुळेच औकात मला माझी कळते ,
मित्रा, तू तर मला आजमावून पहा

तुझ्या अंगणामध्येही उतरेल थवा ,
तुझ्या मनाचे हिरवे झाड करून पहा

रोख तुझ्या बघण्याचा बदलायचाय का?
मग तू हळूच डोळे मिचकावून पहा

जमणारच नाही, हे वरवर म्हणतो मी ,
यायचेच आहे .. तू बोलावून पहा

३.
वरतुनी दिसतो जरी शिस्तीत माझा चेहरा
आत पण कुठल्यातरी तंद्रीत माझा चेहरा

भोवताली पिंजर्‍याच्या सारखे काहीतरी
या अशा अदृश्यशा जाळीत माझा चेहरा

तो निळ्या गगनास ह्या देइल उद्या हिरवेपणा 
पेरतो मी आज हा मातीत माझा चेहरा

एक माझ्या आतला जो वेगळा आहे कुणी
तोच वापरतो मला लावीत माझा चेहरा

केंद्रबिंदू भोवतीच्या एक वलयातील मी 
हा कधी नव्हताच वलयांकीत माझा चेहरा

एक माझ्या चेहर्‍याच्या आत लाखो चेहरे
लाख शकलांचाच एकत्रीत माझा चेहरा

घेतली जाते कुठे एखाद ठिपक्याची दखल
चेहर्‍यांच्या एवढ्या गर्दीत माझा चेहरा

चेहर्‍याची सावली पायात येते सारखी
मीच आता चालतो तुडवीत माझा चेहरा

४.
नांगराचा फाळ हे जे खरडतो आहे
की लिपी हिरवी उद्याची गिरवतो आहे

एकदाही मी उन्हें बोलावली नव्हती
हा कवडसा कोठला डोकावतो आहे

धावतो घोडा कधीपासुन विचारांचा
मी मला त्यावर बसुन का दमवतो आहे

शून्य दुनिया आणि आपण त्यातली शून्ये
शून्य जो तो आपले का मोजतो आहे

आणखी आहे कुठे झोळीमधे जागा ?
आणखी तू काय येथे मागतो आहे

हातवारे करत वेडा काय लिहितो की
की हवेच्या आत लेणे कोरतो आहे

५.
एकमेकासारखे आपण
पण तरीही वेगळे आपण

याच काळाचे चरे आपण
याच काळाची नखे आपण

काय नक्की पाहिले येथे ?
काय नाही पाहिले आपण ?

जे कधी विरणार नाही ते
होत का नाही धुके आपण

सूर्य आपण प्राशला होता
चांदणे कवटाळले आपण

ही कुणाची पंढरी आहे ?
आणली दिंडी कुठे आपण
.............................................
दास पाटील

No comments:

Post a Comment