गौतम राऊत : चार गझला



१.
जरी होत आहे तिचा कोंडमारा
विझू देत नाही मनाचा निखारा

तुम्ही एकतर्फी कसे दोष देता..?
कुठे चूक होती तिलाही विचारा

तुझ्या शिक्षणाचे खुले दार केले
किती सोसला मग तिने थेट मारा

मनासारखे जग इथे कोण आहे
कुणी ठेवतो का तुझ्यावर पहारा

परत जा घरी आज येणार ना तो
तिला रोज सांगे नदीचा किनारा

तिच्या सोसण्याची कुठे नोंद नाही
इथे कोण झाले कुणाचा सहारा..

२.
हात दे तेवढा चढावावर
फक्त धक्का नको उतारावर

बोंब केली कुणी कळेना पण
लक्ष ठेवा जरा गिधाडावर

जिंकले मन जरी विवेकाने
लावली जिंदगी जुगारावर

शांत डोके तुझे असू दे तू
खूप छळते म्हणे भणकल्यावर

हात हातातुनी सुटावे का..?
काय झाले असे किना-यावर

त्रास होतो किती पुन्हा सांगू..?
आठवण हातची निसटल्यावर

का नजर टाळते..पुढे जाते..
चारचौघीत ती मिसळल्यावर

३.
काढले नाही कुणाचे कोथळे बघ
राहिले काही उपाशी कावळे बघ

जर कुणाला वाटते ही जात मिटली?
धर्म जातीचे हवे तर सोहळे बघ..

तू  नको  विश्वास ठेवू बोलण्यावर
कापले आहेत का आधी  गळे बघ..

तो तिला आवाज देतो खूपवेळा
नाव घेतो शेवटी का वेगळे बघ..

सामना केला कसा मी काय सांगू?
भोवती घोंघावणारीे वादळे बघ..

जन्मनोंदी पाहिल्या नाही कधी पण
वय तिचे नक्की असावे कोवळे बघ..

होत गेला...जिंदगानीचा तमाशा
बोलले नाहीच दोघे मोकळे बघ..

४,
कळावे पाखरांनाही जरा सज्ञान झाल्यावर
कुठे थांबायचे आहे विषारी रान झाल्यावर

इथे आहेत बसलेले...तुझे काही छुपे शत्रू
तुला बेजार करतिल ते तुझे उत्थान झाल्यावर

खुबीने टाळला होता जरी उल्लेख त्यांचा तू
विचारांना नको टाळू जगाची शान झाल्यावर

सुखाने चालला होता.. कुठे संसार वेलीचा
मुळांना दोष का द्यावा फुले नादान झाल्यावर

पुढे सरसावल्या आता शिकाया आमच्या पोरी
लढाया जिंकल्या त्यांनी जरी अपमान झाल्यावर

...........................................
गौतम राऊत,
ब्रम्हपुरी
 ९८५०१२९९५२

1 comment:

  1. खूप सुंदर
    शुभेच्छा सर💐💐💐💐💐

    ReplyDelete