रुपेंद्र कदम 'रूपक' : पाच गझला


१.                                           
तुझ्याप्रमाणे विशाल मी मन ‌कुठून आणू?

नजर ठरेना असे निळेपण कुठून आणू?

घडा भरावा अशीच पापे समोर होती
करंगळीवर तुझे सुदर्शन कुठून आणू?

जरी घडवतो तुझीच मुर्ती अती खुबीने
तुझ्याप्रमाणे सजीव यौवन कुठून आणू?

म्हणावयाला कितीक वेणू सभोवती पण
सुरावटींचे अचूक कोंदण कुठून आणू?

इथे मघाशी मला मिळाला दगड तहाचा
सफेद भाळी पुन्हा 'तसे' क्षण कुठून आणू?

तुझी सुनामी क्षणाक्षणाला दिसायची पण
मनात माझ्या उधाणलेपण कुठून आणू?

जगायचे मी नवे बहाणे शिकून घेतो
पुन्हा नव्याने जुनेच कारण कुठून आणू?

फिरून जन्मे कितीतरी मी तुला मिळालो
तुझाच झालो अता दुजेपण कुठून आणू?

२.                 
जन्म मृत्युच्या मधील अंतर वाढत जाते
इंजिनात मग उगाच घरघर वाढत जाते

प्रश्नपत्रिका बघायला तर छोटी असते
वेळ खर्चण्या बळेच उत्तर वाढत जाते

अमृतास मी तहानलेला राहू होतो
देह भागतो परंतु मरमर वाढत जाते

वेगवेगळ्या रुपात येतो भेटायाला
ओळखीत मग अनोळखी भर वाढत जाते

तोच चेहरा पुन्हा असावा वाटत जाते
ओढ लागते कुपीत अत्तर वाढत जाते

अडगळीतले जुनेच पुस्तक हाती घेतो
धूळ झटकतो मनात काहुर वाढत जाते

३.                 
तशा तर बाहुल्या आम्ही तुझा पण खेळ न्यारा हा
कशाला मांडला आहे विनाकारण पसारा हा

नको सांगूस गोष्टी तू मला मागील जन्माच्या
इथे एकाच जन्मीचा जरा गाठू किनारा हा

विषय साधा सरळ होता तुला विसरून जाण्याचा
मनाने टाकले फासे पुन्हा फसला पिसारा हा

पुण्याने पाहिली मुंबइ मनी मग चलबिचल झाली
पुढे लोणावळ्याला मग उठत गेला शहारा हा

नसावी कल्पना त्याला शिवाराच्या कमाईची
खुळ्या आशेवरी जगतो चुलीमधला निखारा हा

अता कंटाळलो आहे फिरुन लक्षावधी योनी
कधी पोचायचा माझा तुझ्यापाशी पुकारा हा

४.
असे काही घडत गेले
तुझे वासे फिरत गेले

मला नाही जरी कळले
तुला सारे कळत गेले

इथे आत्ता जुळत होते
इथे आत्ता तुटत गेले

कडी लावू कशी आता
किती तारे उडत गेले

नका माझे बघू म्हणतो
तरी सगळे बघत गेले

तुझ्यातुन मी वजा झालो
गणित झरझर सुटत गेले

पुन्हा गावी जसा आलो
शहर अंगी भिनत गेले

जसे दिसते तसे नाही
मला मीपण छळत गेले

किती साजुक तुझे डोळे
सुरी झाले घुसत गेले

५.                   
पुन्हा काळजावर जखम होत आहे
पुन्हा वेदना ही मलम होत आहे

पुन्हा वाट अडवी तुझा तोच काटा
पुन्हा टाच माझी नरम होत आहे

पुन्हा न्याय माझा सजा भोगतो अन्
पुन्हा मान माझी कलम होत आहे

पुन्हा थंड वारा लपेटून जाता
पुन्हा एक काया गरम होत आहे

पुन्हा राहिला हात त्याचा रिकामा
पुन्हा भूक त्याची खतम होत आहे

पुन्हा एक साधू पुन्हा एक संधी
पुन्हा एक भक्ती परम होत आहे

 ............................................
रुपेंद्र कदम 'रूपक'
 पुणे

No comments:

Post a Comment